महत्वाच्या बातम्या

 गोंदियातील शासकीय कार्यालये तंबाखूमुक्त करण्यासाठी धडक मोहीम : १३८ व्यक्तींवर कारवाई, ७४ हजारांचा दंड वसूल


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / गोंदिया : जिल्ह्यातील सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालये तंबाखूमुक्त व्हावीत यासाठी गोंदिया जिल्हाधिकारी प्रजित नायर यांनी आदेश दिल्यानंतर आरोग्य विभागाकडून व्यापक तपासणी मोहीम सुरू करण्यात आली आहे.

या मोहिमेंतर्गत सन २०२४ - २०२५ मध्ये अंमलबजावणी पथकाने आतापर्यंत १८ शासकीय कार्यालयांवर धाड टाकून तंबाखू सेवन करताना आढळलेल्या तब्बल १३८ व्यक्तींवर कारवाई केली आहे.

या तपासणी मोहिमेत एकूण ७४ हजार ०२० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला असून, ही रक्कम शासकीय तिजोरीत जमा करण्यात आली आहे. यामध्ये आरोग्य विभागाने १७ हजार ६२० रुपये, तर पोलिस विभागाने ६ पोलिस ठाण्यांच्या कार्यक्षेत्रातून ५६ हजार ४०० रुपयांचा दंड वसूल केला आहे.

ही संपूर्ण कारवाई तंबाखू नियंत्रण व कोटपा कायदा २००३ अंतर्गत जिल्हाधिकारी प्रजित नायर, पोलीस अधीक्षक गोरख भामरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम. मुरुगानंथम यांच्या संयुक्त सहकार्याने केली जात आहे. ही मोहीम तंबाखूजन्य पदार्थांच्या सवयींवर नियंत्रण आणण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरत आहे.

आरोग्य विभागाचे अंमलबजावणी पथक सक्रिय -
राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील के.टी.एस. शासकीय सामान्य रुग्णालय येथे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अमरिश मोहबे व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली अंमलबजावणी पथक कार्यरत आहे.

या पथकात डॉ. अनिल आटे (जिल्हा मौखिक आरोग्य अधिकारी), डॉ. अमोल राठोड (दंतरोग तज्ज्ञ), डॉ. ज्योती राठोड (जिल्हा सल्लागार), सुरेखा आझाद मेश्राम (मनोवैज्ञानिक), संध्या शंभरकर (सामाजिक कार्यकर्ता) आणि विवेकानंद कोरे (दंत सहाय्यक) हे अधिकारी व कार्यकर्ते समाविष्ट आहेत. हे पथक विविध शासकीय कार्यालयांमध्ये जाऊन कोटपा कायदाबाबत जनजागृती करत आहे.

या कार्यालयांमध्ये होणार पुढील तपासणी -
जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, सार्वजनिक बांधकाम विभाग, नगर परिषद, तहसील कार्यालये, पोस्ट ऑफिस, वन विभाग, आरोग्य संस्था, बँका व सहकारी संस्था यांसह अनेक कार्यालयांमध्ये धाडसत्रे राबवण्यात येणार आहेत.

याशिवाय, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम. मुरुगानंथम यांनी पंचायत समिती कार्यालये, शाळा आणि ग्रामपंचायतींना तंबाखूमुक्त करण्यासाठी स्वतंत्र पथके तयार करून कारवाई करण्याच्या सूचना आरोग्य विभागाला दिल्या आहेत.

जिल्ह्यातील सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने या मोहिमेचे महत्त्व लक्षात घेता, तंबाखू विरोधात शासकीय यंत्रणांनी उचललेले हे पाऊल निश्चितच स्वागतार्ह आणि प्रेरणादायक आहे.





  Print






News - Gondia




Related Photos