महत्वाच्या बातम्या

 संभाव्य दुष्काळी परिस्थितीचा विचार करून पशुधनासाठी चारा नियोजन करा - ॲङ निलेश हेलोंडे पाटील


- सिंचन प्रकल्पाच्या गाळपेर क्षेत्रातही चारा लागवड करावी

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा : संभाव्य दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता जिल्ह्यातील पशुधनासाठी चाऱ्याचे योग्य नियोजन करणे आवश्यक आहे. यासाठी उपलब्ध सिंचन प्रकल्पाच्या गाळपेर क्षेत्रातही चारा पिकांची लागवड करून चारा उत्पादन वाढवावे, असे निर्देश वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष ॲड. निलेश हेलोंडे पाटील यांनी दिले.ॲड.निलेश हेलोंडे पाटील यांनी सेलू तालुक्यातील आमगाव येथील मदन उन्नई तलाव सिंचन प्रकल्पाच्या गाळपेर क्षेत्रास अधिकाऱ्यांसमवेत भेट देऊन पाहणी केली. त्यावेळी ते बोलत होते. पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विभागाचे जिल्हा उपायुक्त डॉ.जगदीश बुकतरे, तहसीलदार डॉ.शकुंतला पराजे, मृद संधारण अधिकारी श्री. तुरकाणे, गटविकास अधिकारी शीतल हिरवाळे, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय सहायक आयुक्त डॉ. निरंजन शेटे यांच्यासह पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

मदन उन्नई तलाव सिंचन प्रकल्पाचे सुमारे १० एकर गाळपेर क्षेत्र उपलब्ध असून, या क्षेत्रात चारा पिकांची लागवड केल्यास मोठ्या प्रमाणात चारा उपलब्ध होऊ शकतो. जिल्ह्यातील सिंचनाची सुविधा असलेल्या शेतकऱ्यांनी आपल्या शेतजमिनीवर अधिकाधिक चारा लागवड करावी. त्यामुळे जिल्ह्यातील पशुधनाची चाऱ्याची गरज पूर्ण होण्यास मदत होईल आणि पशुधनाचे आरोग्य व उत्पादन टिकून राहील, असे ॲड. हेलोंडे पाटील म्हणाले.दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांनी निराश न होता चारा उपलब्धतेचे नियोजन करावे. चाऱ्याअभावी जनावरांची गैरसोय होऊ नये, यासाठी जिल्ह्यातील कृषी, जलसंधारण व पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांनी समन्वयाने सकारात्मक नियोजन करावे. तसेच जुलै २०२७ पर्यंत चारा उपलब्धतेबाबत आवश्यक कार्यवाही करावी, असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.

ज्वारी पिकाची कापणी केल्यानंतर शिल्लक राहिलेल्या कडब्यातून नवीन अंकुरणाऱ्या गवतामध्ये हायड्रोसायनिक ॲसिड तयार होत असल्याने असे गवत जनावरांनी खाल्ल्यास विषबाधा होण्याची शक्यता असते. त्यामुळे शेतकऱ्यांनी विशेष सतर्कता व खबरदारी घ्यावी. अधिकाधिक चारा उत्पादनासाठी नेपियर गवत किंवा न्युट्रीफिड बियाण्यांची लागवड करावी, असे आवाहनही ॲड.हेलोंडे पाटील यांनी केले.





  Print






Related Photos