वाघोलीतील शेतकऱ्यांशी भूसंपादनाबाबत समितीची तीन तास चर्चा


- शेतकऱ्यांच्या संमतीनेच पुढील प्रक्रिया राबविणार; संपादित जमिनीचा योग्य मोबदला देण्याची जिल्हाधिकाऱ्यांची ग्वाही
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : जिल्ह्यात प्रस्तावित पोलाद प्रकल्पांसाठी करण्यात येणाऱ्या भूसंपादनाच्या पार्श्वभूमीवर वाघोली येथील शेतकरी आणि स्थानिक रहिवाशांच्या समस्या, शंका व हरकती जाणून घेण्यासाठी जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या अध्यक्षतेखाली गठित समितीने महत्त्वपूर्ण बैठक घेतली. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित या बैठकीत सुमारे तीन तास शेतकऱ्यांशी सविस्तर चर्चा करण्यात आली.शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन आणि त्यांच्या संमतीनेच भूसंपादनाची पुढील प्रक्रिया राबविण्यात येईल. तसेच संपादित करण्यात येणाऱ्या जमिनीचा योग्य मोबदला दिला जाईल, अशी ग्वाही जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी यावेळी दिली.
जिल्ह्यातील प्रस्तावित पोलाद प्रकल्पांसाठी होणाऱ्या भूसंपादनामुळे बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये विविध प्रकारच्या शंका आणि संभ्रम निर्माण झाले आहेत. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या अडचणी प्रत्यक्ष जाणून घेऊन त्यांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी समितीच्या वतीने या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीदरम्यान वाघोली येथील शेतकरी व स्थानिक रहिवाशांनी भूसंपादनाची प्रक्रिया, जमिनीचा मोबदला आणि इतर संबंधित विषयांबाबत आपले प्रश्न, शंका व हरकती समितीसमोर मांडल्या. समितीच्या सदस्यांनी त्यांचे म्हणणे शांतपणे ऐकून घेत विविध मुद्द्यांवर चर्चा केली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ५ नोव्हेंबर २०२६ रोजी नागपूर येथे झालेल्या बैठकीत दिलेल्या निर्देशांनुसार महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने १४ नोव्हेंबर २०२६ रोजीच्या आदेशाद्वारे या समितीची स्थापना केली आहे. प्रस्तावित औद्योगिक प्रकल्पांसाठी होणाऱ्या भूसंपादनामुळे बाधित शेतकऱ्यांच्या समस्या आणि हरकती जाणून घेणे, त्यांचे म्हणणे समजून घेणे तसेच त्यावर आवश्यक कार्यवाही करणे ही जबाबदारी समितीवर सोपविण्यात आली आहे.
कायदेशीर मार्गाने प्रश्न मांडा : पोलीस अधीक्षक एम. रमेश -
बैठकीत पोलीस अधीक्षक एम. रमेश यांनीही शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. शेतकऱ्यांनी आपल्या मागण्या, समस्या आणि हरकती कायदेशीर मार्गाने प्रशासनासमोर मांडाव्यात. आपल्या मागण्यांसाठी रस्ते अडविणे किंवा कायदा हातात घेण्यासारखे प्रकार टाळावेत, असे आवाहन त्यांनी केले. आंदोलन किंवा इतर कृतींमुळे सर्वसामान्य नागरिकांची गैरसोय होणार नाही, याची प्रत्येकाने दक्षता घ्यावी, असेही त्यांनी स्पष्ट केले. शेतकऱ्यांच्या समस्या आणि तक्रारी ऐकून घेण्यासाठी प्रशासन सदैव तयार आहे. त्यामुळे कोणताही प्रश्न संवादाच्या माध्यमातून सोडविण्यासाठी शेतकऱ्यांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस अधीक्षक एम. रमेश यांनी केले.
या बैठकीला अहेरीचे अपर जिल्हाधिकारी संजय आसोले, चामोर्शीचे उपविभागीय अधिकारी संपत खलाटे, मुद्रांक जिल्हाधिकारी स्मिता बेलपत्रे, जिल्हा अधीक्षक भूमिअभिलेख विजय भालेराव, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी गिरी तसेच समितीचे इतर सदस्य अधिकारी उपस्थित होते.
प्रस्तावित पोलाद प्रकल्पांसाठीच्या भूसंपादन प्रक्रियेत शेतकऱ्यांच्या हरकती आणि मागण्यांना प्राधान्य देत संवादातून मार्ग काढण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून सुरू आहे. त्यामुळे आगामी काळात शेतकऱ्यांचे समाधान आणि संमती विचारात घेऊनच पुढील कार्यवाही कशी होते, याकडे वाघोलीसह परिसरातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.




Petrol Price




