महत्वाच्या बातम्या

 लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार : आरोपीला तीन दिवसांची पोलीस कोठडी


- सात गावांतील गाळपेर जमिनीचा होणार वापर; मका, सुपर नेपीयर आणि बाजरी लागवडीचे नियोजन

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर : जिल्ह्यात संभाव्य चारा टंचाई निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता प्रशासनाने आतापासूनच उपाययोजना सुरू केल्या आहेत. रामटेक तालुक्यातील खिंडसी तलाव परिसरातील सात गावांच्या हद्दीतील गाळपेर जमिनीवर तब्बल १ हजार ५० एकर क्षेत्रात चारा लागवड करण्यात येणार आहे. प्रत्येक गावात १५० एकर क्षेत्रावर लागवड करण्याचे नियोजन असून, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी या योजनेला मान्यता दिली आहे. या उपक्रमामुळे जनावरांसाठी चाऱ्याची उपलब्धता वाढण्यास मदत होणार आहे. गाळपेर क्षेत्रातील चारा लागवडीच्या नियोजनासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित विभागांना आवश्यक निर्देश दिले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी अनुप खांडे, रामटेकचे उपविभागीय अधिकारी प्रियेश महाजन, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. अर्चना कडू, पशुसंवर्धन विभागाचे बळी, गटविकास अधिकारी तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

पाण्याच्या उपलब्धतेनुसार पिकांची निवड -
गाळपेर जमिनीतील पाण्याची उपलब्धता लक्षात घेऊन चारा पिकांचे नियोजन करण्यात आले आहे. ज्या जमिनीवर पाण्याचे स्रोत मुबलक आहेत, अशा ठिकाणी मका लागवड करण्यात येणार आहे. मध्यम स्वरूपाचा पाणीसाठा असलेल्या जमिनीवर सुपर नेपीयर, तर कमी पाणी उपलब्ध असलेल्या क्षेत्रात बाजरीची लागवड केली जाणार आहे. उर्वरित जमिनीवर गोशाळा आणि शेतकरी उत्पादक कंपन्यांना चारा लागवडीसाठी परवानगी देण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी स्पष्ट केले.

तालुकास्तरीय गाळपेर समिती गठीत -
चारा लागवडीचे नियोजन आणि अंमलबजावणी प्रभावीपणे करण्यासाठी रामटेक तालुकास्तरीय गाळपेर समिती गठीत करण्यात आली आहे. तहसीलदार हे समितीचे अध्यक्ष, तर तालुका पशुसंवर्धन अधिकारी सदस्य सचिव असतील. गटविकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी तसेच पाटबंधारे आणि लघुपाटबंधारे विभागाचे अभियंते समितीचे सदस्य म्हणून काम पाहणार आहेत. रामटेक तालुक्याच्या धर्तीवर जिल्ह्यातील अन्य तालुक्यांमध्येही अशाच प्रकारच्या तालुकास्तरीय समित्या स्थापन करण्यात येणार आहेत. त्यामुळे प्रत्येक तालुक्यातील उपलब्ध गाळपेर जमिनीचा आढावा घेऊन स्थानिक परिस्थितीनुसार चारा लागवडीचे नियोजन करता येणार आहे.

व्हीबी-जी राम जी योजनेंतर्गत बियाणे उपलब्ध -
व्हीबी-जी राम जी योजनेंतर्गत गाळपेर क्षेत्रात मका, बाजरी आणि सुपर नेपीयर या चारा पिकांची लागवड करण्यात येणार आहे. यासाठी संबंधित गाळपेर समितीची मान्यता घेणे आवश्यक राहणार आहे. जिल्ह्यात आतापर्यंत सुमारे तीन कोटी रुपये किमतीचे ७७ हजार ५०० किलो बियाणे वितरित करण्यात आले आहे. बियाण्यांचा पुरेसा साठा उपलब्ध असून, ज्या शेतकरी किंवा संस्थांना चारा पिकांच्या लागवडीसाठी बियाणे आवश्यक आहे, त्यांनी प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.

छायाचित्रांसह लागवडीचा आढावा घेणार -
लागवड करण्यात आलेल्या चारा पिकांची छायाचित्रे सादर करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित यंत्रणांना दिल्या आहेत. या मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी कृषी, पशुसंवर्धन, महसूल आणि पाटबंधारे विभागांनी परस्पर समन्वयाने काम करावे, असे निर्देश त्यांनी दिले. याशिवाय नगरपरिषद क्षेत्रातील गायरान आणि गाळपेर जमिनीवरही चारा लागवडीचे नियोजन करण्यात येणार आहे.





  Print






Related Photos