रासायनिक उत्पादनांचे वैश्विक केंद्र बनण्याची भारताला संधी - प्रधानमंत्री नरेंद्र मोदी


- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत इंडिया केम २०२६ चे उद्घाटन
- रासायनिक उद्योगासाठी पालघरमध्ये मोठे औद्योगिक केंद्र विकसित करण्याचे नियोजन
- रसायने क्षेत्रात गुंतवणुकीच्या संधी आणि जागतिक पुरवठा साखळ्यांमधील भारताचा सहभाग वाढविण्यास चालना
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / मुंबई : ॲन इमर्जिंग ग्लोबल केमिकल हब या संकल्पनेवर आधारित इंडिया केम २०२६ हे प्रदर्शन उद्योग क्षेत्रातील धोरणकर्ते, गुंतवणूकदार, संशोधक आणि उद्योजकांना एकत्र आणणारे महत्वाचे व्यासपीठ ठरत आहे. या माध्यमातून नवीन भागीदारी, गुंतवणुकीच्या संधी आणि जागतिक पुरवठा साखळ्यांमधील भारताचा सहभाग वाढविण्यास चालना मिळेल, असा विश्वास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला. या माध्यमातून देशाला जागतिक रासायनिक उत्पादन केंद्र बनविण्याची संधी असल्याचेही प्रधानमंत्री मोदी यांनी सांगितले.
गोरेगाव येथील नेस्को एक्झिबिशन सेंटरमध्ये आयोजित इंडिया केम २०२६ या आंतरराष्ट्रीय प्रदर्शनाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत केंद्रीय रसायने मंत्री जगतप्रसाद नड्डा यांच्या हस्ते झाले. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव, ओडिशाचे मुख्यमंत्री मोहन चरण माझी, केंद्रीय राज्यमंत्री अनुप्रिया पटेल यांच्यासह विविध राज्यांचे प्रतिनिधी, वरिष्ठ अधिकारी, उद्योग क्षेत्रातील मान्यवर आणि देश-विदेशातील गुंतवणूकदार उपस्थित होते. या प्रसंगी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी इंडिया केम २०२६ निमित्त दिलेल्या संदेशात भारताच्या रासायनिक आणि पेट्रोकेमिकल उद्योगाचे अर्थव्यवस्थेतील महत्व अधोरेखित केले. केंद्रीय मंत्री नड्डा यांनी हा संदेश वाचून दाखवला.
कृषी, औषधनिर्मिती, वस्त्रोद्योग आणि वाहननिर्मिती यांसारख्या विविध क्षेत्रांसाठी रासायनिक उत्पादनांची आवश्यकता असून, या उद्योगाची वाढ देशांतर्गत उत्पादन आणि आत्मनिर्भर भारताच्या उद्दिष्टांशी निगडित आहे, असेही त्यांनी संदेशात म्हटले.
रासायनिक उद्यानांच्या विकासासाठी भव्य रसायन योजनेची अंमलबजावणी आणि संशोधन, विकास व नवोन्मेष योजनेत रासायनिक व पेट्रोकेमिकल क्षेत्राचा समावेश हे उद्योगाच्या वाढीसाठी महत्त्वाचे टप्पे आहेत.
सेमीकंडक्टर उत्पादन, स्वच्छ ऊर्जा आणि विद्युत वाहनांसाठी आवश्यक प्रगत रसायनांची वाढती मागणी लक्षात घेता, भारतीय उद्योगांनी आधुनिक तंत्रज्ञान आणि उच्च मूल्यवर्धित उत्पादनांमध्ये गुंतवणूक करावी. शाश्वत उत्पादन पद्धती आणि संसाधनांचा कार्यक्षम वापर यांनाही प्राधान्य द्यावे, असे आवाहन पंतप्रधानांनी केले.




Petrol Price




