महत्वाच्या बातम्या

 रोहित पठाळे यांच्यावरील अत्याचाराचा बल्लारपुरात निषेध : दोषींवर कठोर कारवाईची मागणी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर येथील आंबेडकरी चळवळीतील सक्रिय कार्यकर्ते रोहित पठाळे यांच्यावर झालेल्या कथित अमानुष अत्याचाराच्या घटनेचा अनुसूचित जाती विभाग काँग्रेस कमेटी, बल्लारपूर शहर, जिल्हा चंद्रपूर यांच्या वतीने तीव्र निषेध नोंदविण्यात आला. या प्रकरणातील दोषींवर तातडीने कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करणारे निवेदन बल्लारपूरच्या तहसीलदार रेणुका कोकाटे यांच्यामार्फत महाराष्ट्राचे राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांना सादर करण्यात आले.

लोकशाही व्यवस्थेत प्रत्येक नागरिकाला सन्मानाने जगण्याचा तसेच आपले विचार मांडण्याचा संवैधानिक अधिकार आहे. सामाजिक आणि आंबेडकरी चळवळीत सक्रिय असलेल्या कार्यकर्त्यावर अशा प्रकारचा अत्याचार होणे ही गंभीर बाब असून, या घटनेमुळे आंबेडकरी समाजासह समविचारी नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन संबंधित आरोपींवर तातडीने कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. अन्यथा लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल आणि त्याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे. अनुसूचित जाती विभाग काँग्रेस कमेटी, बल्लारपूर शहराच्या वतीने रुपेश रामटेके, चेतन गेडाम, गणपत इटनकर, संजय झील्लेवार यांच्या सह आदी कार्यकर्त्यांनी तहसीलदार रेणुका कोकाटे यांच्याकडे निवेदन सादर केले.





  Print






Related Photos