वजनाप्रमाणे बांबू विक्रीचा प्रयोग झाला सफल


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / भामरागड :
ग्रामसभांकडून बांबू बंडल च्या न परवडणाऱ्या दरात मागणीमुळे सलग दोन वर्षे रोजगार असूनही नसल्याची स्थिती होती. याबाबत अनेक टिका टिप्पणी होत होती. मात्र २४ मे रोजी बल्लारपूर येथील पेपरमिल च्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून वजनाप्रमाणे बांबू विक्रीचा प्रयोग करण्याचा निश्चय केला आणि हा प्रयोग सफल झाल्याने आदिवासींच्या रोजगाराचा प्रश्न काही अंशी मिटला आहे, अशी माहिती भामरागड पंचायत समितीचे सभापती सुखराम मडावी यांनी दिली आहे.
वजनाप्रमाणे बांबू विक्रीचा प्रयोग इलाखा समिती व ग्रामसभा कुचेर, ग्रामपंचायत टेकला मध्ये राबविण्यात आला. याला ग्रामस्थांकडून प्रतिसाद मिळाला. तसेच वनविभागाच्या अधिकाऱ्यांच्या समन्वयाने या प्रयोगाला वाट मिळाली. आर्थिक व्यवहार बॅंकेद्वारे केले जातील. खर्च व कर वगळता ४ हजार ५०० रूपये टन याप्रमाणे दर राहील. रस्ते, दोरी व इतर खर्च ग्रामसभांचा राहिल अशा अटी व शर्तीनुसार बांबू विक्रीचा करार मान्य करण्यात आला. या दराप्रमाणे जो अपेक्षित दर आहे तो मिळता जुळता आहे. त्यामुळे जास्तीत जास्त ग्रामसभांकडून यावर्षी गौण वनोपजाचे व्यापार झालेले आहेत. इलाक्यातील ग्रामसभांच्या कार्यकर्त्यांना बाजारपेठ व समुहात काम करताना अडचणी होत असल्यामुळे आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून किंवा अभ्यास गटाच्या माध्यमातून पुढील सत्रात स्वतः बाहेरील बाजारपेठेत पोहोचविण्याचे प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती सभापती सुखराम मडावी यांनी दिली आहे.

   Print


News - Gadchiroli | Posted : 2018-10-07


Related Photos