शेतातील विद्युत प्रवाहाने अस्वलासह चार महिन्यांच्या पिलाचा करुण अंत : वन्यजीवांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : पिकांचे वन्यप्राण्यांपासून संरक्षण करण्यासाठी शेतात लावलेल्या विद्युत प्रवाहाच्या तारांनी एका अस्वलासह तिच्या अवघ्या चार महिन्यांच्या पिलाचा जीव घेतल्याची धक्कादायक घटना चिमूर बीटातील कवडशी शेतशिवारात सोमवारी उघडकीस आली. पिकांचे संरक्षण करण्याच्या नावाखाली बेकायदेशीरपणे विद्युत प्रवाह सोडण्याच्या प्रकारामुळे मुक्या वन्यजीवांचा बळी जात असून, या घटनेने वन्यजीवांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. प्राप्त माहितीनुसार, तळोधी नाईक येथील रहिवासी फकीरा रणदिवे यांनी चिमूर येथील यादव गोठे यांचे कवडशी परिसरातील शेत भाड्याने घेतले होते. या शेतात कापूस व धान पिकांची लागवड करण्यात आली होती. पिकांचे वन्यप्राण्यांपासून संरक्षण करण्यासाठी शेताभोवती तार लावून त्यामध्ये विद्युत प्रवाह सोडण्यात आला होता. याच तारांचा स्पर्श झाल्याने अस्वल आणि तिच्या चार महिन्यांच्या पिलाचा जागीच मृत्यू झाला.
दरम्यान, अस्वलाची दोन पिले झाडावर चढल्याची माहिती वनविभागाला मिळाली होती. त्यानुसार वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी फटाके फोडून झाडावरील दोन्ही पिलांना सुरक्षितपणे खाली उतरविले. मात्र, परिसराची पाहणी करीत असताना वनकर्मचाऱ्यांना एक अस्वल आणि तिचे सुमारे चार महिन्यांचे पिल्लू मृतावस्थेत आढळून आले. एका अस्वल कुटुंबावर ओढवलेल्या या संकटामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. घटनेची माहिती मिळताच सहायक वनसंरक्षक महेश गायकवाड, वनपरिक्षेत्र अधिकारी किशोर देऊळकर, मानद वन्यजीव रक्षक अमोद गौरकर, क्षेत्रपाल निशा राठोड तसेच महावितरणचे अभियंता सुमित दडमल यांनी घटनास्थळी भेट दिली. घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला असून, मृत अस्वल व पिलाला शवविच्छेदनासाठी खडसंगी येथे पाठविण्यात आले आहे.
शेतीचे नुकसान टाळण्यासाठी वन्यजीवांच्या जीवाशी खेळण्याचा हा प्रकार अत्यंत गंभीर मानला जात आहे. शेतात अनधिकृतपणे विद्युत प्रवाह सोडल्यामुळे केवळ अस्वलच नव्हे, तर अन्य वन्यप्राणी आणि मानवी जीवांनाही धोका निर्माण होऊ शकतो. या प्रकरणी संबंधित शेतमालक व जबाबदार व्यक्तींविरुद्ध वनविभागाकडून कायदेशीर कारवाई होण्याची शक्यता असून, अशा जीवघेण्या प्रकारांना आळा घालण्याची गरज व्यक्त होत आहे.




Petrol Price




