महत्वाच्या बातम्या

 राजगाटा परिसरात वाघाची दहशत : आठ गावांतील नागरिकांमध्ये भीती


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : गडचिरोली तालुक्यातील राजगाटा चक परिसरात वाघाचा मुक्त संचार सुरू असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. राजगाटा परिसरासह जेप्रा, दिभना, उसेगाव, आंबेशिवणी, आंबेटोला, भिकारमौशी आणि कळमटोला या गावांच्या परिसरातही वाघाचा वावर असल्याचे चित्र आहे. त्यामुळे या गावांतील नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.

गावांच्या आसपास तसेच शेतशिवारात वाघाचा वावर असल्याने ग्रामस्थांना दैनंदिन कामे करताना सतर्क राहावे लागत आहे. शेतीची कामे करणे, जनावरे चारण्यासाठी नेणे तसेच गावातून ये-जा करताना वाघाच्या संभाव्य हल्ल्याची भीती नागरिकांना सतावत आहे. विशेषतः शेतकरी, शेतमजूर आणि गुराख्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

वाघाचा वावर लक्षात घेता नागरिकांनी खबरदारी घेण्याची गरज आहे. शेतात किंवा जंगल परिसरात जाताना एकट्याने जाणे टाळावे, तसेच रात्री-अपरात्री घराबाहेर पडताना विशेष काळजी घ्यावी. परिसरातील नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने वनविभागाने वाघाच्या हालचालींवर लक्ष ठेवून आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे.





  Print






Related Photos