महत्वाच्या बातम्या

 जिल्ह्यातील बंद धान खरेदी केंद्रे तातडीने सुरू करा!


- आमदार रामदास मसराम यांचे आदिवासी विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांना निर्देश; शेतकरी नोंदणी प्रक्रिया सुरू करण्याचीही मागणी

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : खरीप हंगामातील धान कापणी आणि मळणीची कामे अंतिम टप्प्यात आली असताना आदिवासी विकास महामंडळाची अनेक धान खरेदी केंद्रे अद्याप बंद असल्याने शेतकऱ्यांसमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत. धान विक्रीसाठी केंद्रे सुरू होण्याची प्रतीक्षा करावी लागत असल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. या परिस्थितीची दखल घेत आमदार रामदास मसराम यांनी २० नोव्हेंबर रोजी गडचिरोली येथील आदिवासी विकास महामंडळाच्या प्रादेशिक कार्यालयाला भेट देऊन प्रादेशिक व्यवस्थापक सोपान संबारे यांच्याशी चर्चा केली. जिल्ह्यातील बंद असलेली सर्व धान खरेदी केंद्रे तातडीने सुरू करण्याचे तसेच ज्या केंद्रांवरील शेतकरी नोंदणी प्रक्रिया बंद आहे, ती त्वरित सुरू करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

धान हे गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे प्रमुख खरीप पीक आहे. मोठ्या कष्टाने पिकविलेल्या धानाची विक्री करून शेतकरी पुढील हंगामाच्या तयारीसह कुटुंबाचा आर्थिक खर्च भागविण्याचे नियोजन करतात. मात्र, हंगाम सुरू असतानाही आदिवासी विकास महामंडळाची धान खरेदी केंद्रे बंद असल्याने शेतकऱ्यांना आपले धान विक्रीसाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यातच काही केंद्रांवर शेतकरी नोंदणी प्रक्रिया बंद असल्याने शेतकऱ्यांची गैरसोय वाढली आहे.





  Print






Related Photos