महत्वाच्या बातम्या

 शिवकुंडातील पाण्यात बुडून दहावीतील १६ वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू


- मित्रांसोबत फिरायला गेलेल्या पीयूष जिजोतेचा दुर्दैवी अंत; कुटुंबाचा एकुलता एक मुलगा गमावल्याने पवनी गावावर शोककळा

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / नागपूर : मित्रांसोबत फिरायला गेलेल्या दहावीतील १६ वर्षीय विद्यार्थ्याचा शिवकुंडातील पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना शनिवारी १० ऑक्टोबर दुपारी घडली. पीयूष जिजोते १६ रा. पवनी, ता. रामटेक असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. शिवकुंड येथील उंच कड्यावरून पाण्यात उडी मारल्यानंतर तो बराच वेळ पाण्याबाहेर न आल्याने ही दुर्घटना उघडकीस आली. या घटनेमुळे पवनी गावात शोककळा पसरली असून, कुटुंबातील एकुलता एक मुलगा गमावल्याने जिजोते कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

वडिलांच्या व्यवसायात मदत करून मित्रांसोबत गेला फिरायला -
मिळालेल्या माहितीनुसार, पीयूष हा पवनी येथील जयसेवा आदर्श हायस्कूलमध्ये इयत्ता दहावीमध्ये शिक्षण घेत होता. शनिवारी शाळेला सुट्टी असल्याने सकाळी तो वडील विजय जिजोते यांच्यासोबत त्यांच्या तयार कपड्यांच्या व्यवसायात मदत करण्यासाठी गेला होता. विजय जिजोते हे आजूबाजूच्या गावांमध्ये फेरीवाल्यांच्या माध्यमातून कपड्यांची विक्री करतात.

दुपारी घरी परतल्यानंतर पीयूष हा दुपारी ३ ते ३.३० वाजताच्या सुमारास आपले मित्र लक्ष पिलगर १५ वर्षे आणि अंकित वाढीवे १५ वर्षे दोघेही रा. पवनी, यांच्यासोबत दुचाकीने शिवकुंड येथे फिरण्यासाठी गेला होता.

उंच कड्यावरून उडी मारली; बराच वेळ पाण्याबाहेर आलाच नाही -
शिवकुंड येथे पोहोचल्यानंतर तेथील पाणी पाहून पीयूषने उंच कड्यावरून पाण्यात उडी मारली. मात्र, उडी मारल्यानंतर बराच वेळ होऊनही तो पाण्याबाहेर आला नाही. त्यामुळे त्याच्यासोबत असलेल्या मित्रांमध्ये घबराट पसरली. पीयूष पाण्यातून बाहेर येत नसल्याचे लक्षात येताच मित्रांनी तातडीने त्याच्या कुटुंबीयांना या घटनेची माहिती दिली.

या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. शिक्षण घेत असलेल्या अल्पवयीन मुलाचा अशा प्रकारे मृत्यू झाल्याने पवनी गावातील नागरिकांनाही मोठा धक्का बसला आहे.

एकुलत्या एक मुलाच्या मृत्यूने कुटुंबावर दुःखाचा डोंगर -
पीयूष हा जिजोते कुटुंबातील एकुलता एक मुलगा होता. मुलाच्या निधनाच्या वृत्ताने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. एका क्षणात कुटुंबाचा आधार आणि भविष्याच्या अनेक आशा हरपल्याने परिसरात शोक व्यक्त केला जात आहे.

दरम्यान, शिवकुंडसारख्या जलस्थळांवर फिरायला जाताना पर्यटकांनी आणि विशेषतः तरुणांनी पाण्याची खोली, प्रवाह आणि परिसरातील धोकादायक कडे यांचा अंदाज घेऊनच वागणे आवश्यक आहे. अशा ठिकाणी सुरक्षिततेच्या नियमांचे पालन करणे आणि धोकादायक ठिकाणांहून पाण्यात उड्या मारणे टाळणे गरजेचे आहे.





  Print






Related Photos