महत्वाच्या बातम्या

 गुढीपाडवा : शास्त्रशुद्ध परंपरा आणि अपप्रचार


प्रस्तावना : हिंदु नववर्षारंभ म्हणजेच गुढीपाडवा, हा सण आपण चैत्र शुक्ल प्रतिपदेला साजरा करतो. ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली, म्हणजे सत्ययुगाला सुरुवात झाली, तो हा दिवस असल्याने या दिवशी वर्षारंभ केला जातो. गुढीपाडव्याला सुरू होणारे नवीन वर्षाचे कालचक्र हे विश्‍वाच्या उत्पत्तीकाळाशी निगडित असल्याने सृष्टी नवचेतनेने भारित झालेली असते.गुढीपाडव्याच्या दिवशी सूर्योदयानंतर लगेचच मांगल्याचे, समृद्धीचे प्रतीक असलेल्या गुढीचे पूजन करून गुढी उभारावी, असे शास्त्रात सांगितले आहे. मात्र, आज फेसबूक, व्हॉट्स अ‍ॅप यांसारख्या सामाजिक संकेतस्थळांवरून गुढीपाडव्याविषयी अपप्रचार केला जात आहे. गुढीपाडव्याविषयी पसरवले जाणारे अपसमज आणि गुढीपाडव्याची शास्त्रशुद्ध माहिती या लेखात बघणार आहोत.

अपसमज १. शुभ समजला जाणारा कलश गुढीपाडव्याच्या दिवशी उलटा का लावतात ?

खंडन : गुढीवर उलटा घालण्यात आलेल्या कलशाच्या काही प्रमाणात निमुळत्या झालेल्या भागातून तो ब्रह्मांडमंडलातून प्रजापति-लहरी आकृष्ट करून घेतो. या लहरी कलशात सामावून रहातात. कलश उलट घातल्यामुळे ती स्पंदने भूमंडलाकडे आणि पूजकाकडे प्रक्षेपित होतात. देवळातील कळस हा सुद्धा याचप्रमाणे वरच्या दिशेने पूर्णपणे निमुळता असतो आणि तो लहरी आकृष्ट करतो.

अपसमज २. ब्राह्मणांनीच शंभूराजांची हत्या करून गुढी उभारायला प्रारंभ केला !

खंडन १ : वर्ष १६८९ मध्ये औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांचे  हालहाल करून अखेर फाल्गुन अमावास्येच्या दिवशी मारले. दुसर्‍या दिवशी चैत्र शुक्ल पक्ष प्रतिपदा, म्हणजेच गुढीपाडवा हा हिंदूंचा नववर्षदिन होता. हिंदूंनी तो साजरा करू नये, असा औरंगजेबाचा त्यामागे हेतू होता. वस्तूतः हत्येचा गुढीपाडव्याच्या दिवशी उभारल्या जाणार्‍या गुढीशी काहीच संबंध नाही. औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांना हालहाल करून मारले, हा सूर्यप्रकाशाइतका स्वच्छ इतिहास आहे. अनेक ठिकाणी तो संदर्भांसह उपलब्धही आहे. आजपर्यंत एकाही इतिहासकाराने छत्रपती संभाजी महाराजांना ब्राह्मणांनी मारले, असे म्हटलेले नाही. असे असतांना क्रूरकर्मा औरंगजेबाचे पाप झाकण्याचा प्रयत्न का होत आहे? याचा विचार हिंदूंनी करायला हवा.

गुढीपाडव्याविषयी  जातीद्वेषमूलक प्रसाराला बळी पडू नये. हिंदू संस्कृतीनुसार प्रत्येक हिंदूंनी गुढीपाडवा साजरा करून धर्माचरणाचे पालन करावे.

खंडन २ : प्रभु श्रीराम वनवास संपवून अयोध्येत परतले, तेव्हापासून गुढ्या उभारणे, तोरणे लावणे, ही आपली परंपरा आहे.

खंडन ३ : सृष्टीच्या निर्मितीचा दिवस म्हणूनही गुढीपाडव्याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. ब्रह्मदेवाने याच दिवशी सृष्टी निर्माण केल्याचे मानले जाते. म्हणजेच खरे तर हा दिवस केवळ हिंदूंचाच नसून अखिल विश्‍वातील मानवजातीचा आहे.

अपसमज ३. गुढीपूजनाच्या वेळी पालथा गडू आणि लुगडे यांचा वापर म्हणजे अशुभ समजणे

गुढीपूजनाच्या वेळी पालथा गडू आणि लुगडे यांचा वापर करून उभारलेली गुढी ही विटंबना आहे. गुढी उभारताना पालथा गडू, लुगडे यांचा वापर न करता भगवा ध्वज उभारून मंगल कलशाची पूजा करावी. अशा प्रकारचे आवाहन सध्या सामाजिक माध्यमांवर सर्वत्र प्रसारित होत आहे. अशा आवाहनांमुळे हिंदूंमध्ये संभ्रम निर्माण होऊन ते धर्माचरणापासून वंचित रहातात ! तेव्हा शास्त्रानुसार गुढीपूजन कसे करावे, याची शास्त्रशुद्ध माहिती असणे आवश्यक आहे. ती जाणून घेऊ.

आपण ज्याला गुढी म्हणतो, त्याचे प्राचीन नाव ब्रह्मध्वज आहे. त्यामुळे ब्रह्मध्वजाचे पूजन असे म्हटले पाहिजे. गुढी हा शब्द संस्कृत नाही, तर पाडवा प्रतिपदेचा अपभ्रंश आहे. ब्रह्मध्वजपूजनाविषयीची माहिती धर्मसिंधु  या ग्रंथात सुद्धा उपलब्ध आहे.

हिंदूंसाठी चैत्र मासापासून वर्षारंभ असून त्याला दक्षिण भारतात उगादी असेही म्हणतात. सृष्टीचा निर्माता ब्रह्मदेव असून त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या दिवशी ब्रह्मध्वजपूजन करतात आणि तेव्हापासून रामनवरात्र देखील सुरू होते. ब्रह्मध्वजाला हिरवी साडी किंवा निळे कापड अथवा भगव्या वर्णाची साडी, भगवे वस्त्र नेसवतात आणि हे परंपरेला धरून आहे. पूर्वी सुवर्ण किंवा चांदीचे पात्र हे गुढीवर पालथे घातले जाई. पूर्वी देवघरातील देवतांची पात्रे ही चांदीविना इतर कोणत्याही धातूची नव्हती. ही जुनी परंपरा लुप्त होत आहे. कालातरांने चोर्‍या वाढल्या म्हणून चांदीचे भांडे ठेवणे बंद झाले. त्यामुळे सध्या तांब्याचे भांडे वापरले जाते. खरेतर सुवर्ण, चांदी आणि कांस्य यांचा वापर गुढी उभारतांना व्हायला हवा, पण ते शक्य नसल्याने तांबे वापरले जाते. स्टील किंवा प्लास्टिक यांचा वापर पूजनामध्ये करता कामा नये. या दिवशी ब्रम्हांडात प्रजापती लहरी सर्वाधिक कार्यरत असतात. गुढीवर भांडे पालथे ठेवल्याने त्याद्वारे ब्रम्हांडातील प्रजापती लहरी अधिकाधिक ग्रहण करता येतात. मुळात कलश पालथा ठेवणे, हे अशुभ असते हे कोणी ठरवले ? पूर्वीच्या काळी एखादी व्यक्ती बाहेर गेली आणि तिला येण्यास विलंब झाल्यास उंबर्‍यावर पालथा घडा ठेवून तिची वाट बघितली जात असे. याचा अर्थ चांगल्याची वाट बघणे. गुढीवर पालथा कलश ठेवणे  म्हणजे नववर्षादिनापासून ‘हिंदू चांगल्या दिवसांची वाट पहातात’, असाही आहे.

खंडन २ : गुढीपाडवा हा हिंदूंच्या अद्वितीय कालगणनेचे प्रतीक आहे. तो केवळ एक सण नसून, जीवनातील शुभारंभाचे प्रतीक आहे.

त्यामुळे कोणत्याही अपप्रचाराला बळी न पडता, धर्मशास्त्रानुसार गुढीपाडवा पारंपरिक पद्धतीने साजरा करायला हवा. तेव्हाच खऱ्या अर्थाने सण आणि उत्सव यांमध्ये पावित्र्य राहणार आहे. तसेच त्याचा व्यक्तिगत जीवनात आणि सामाजिक दृष्टीनेही सकारात्मकता वाढण्यास मदत होणार आहे.





  Print






News - Editorial




Related Photos