पिकाच्या बचावासाठी गोगाव येथील संतप्त शेतकऱ्यांची जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक


- उद्यापासून उपसा सिंचन योजनेतुन पाणी पुरवठा करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आश्वासन 
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली :
सध्यास्थितीत धान पिकास पाण्याची अत्यंत आवश्यकता असतानाही गोगाव येथील उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून पाणी दिले जात नसल्याने संतप्त झालेल्या गोगाव येथील शेतकऱ्यांनी सिताराम टेंभूर्णे यांच्या नेतृत्वाखाली आज ५ ऑक्टोंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. जिल्हाधिकाऱ्यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून उद्या ६ ऑक्टोंबर रोजी उपसा सिंचन योजनेतून शेतीला पाणीपुरवठा करण्यात येईल, असे आश्वासन दिले.
गोगांव नजिकच्या वैनगंगा नदीवर उपसा सिंचन योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत गोगाव येथील ३५० ते ४०० एकर शेतीस सिंचनाची सुविधा निर्माण होऊ शकते. सध्यास्थितीत शेतकऱ्यांनी शेतीत भातपिकाची लागवड केली आहे. धानपिक परिपक्व होण्याच्या स्थितीत आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारली असल्याने जमीनीस भेगा पडून भातपिक करपण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे गोगांव उपसा सिंचन योजनेतून शेतीसाठी पाणी सोडावे या मागणीकरीता शेतकऱ्यांनी ६ ऑगस्ट रोजी तसेच १४ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता, कारवाफा प्रकल्पाचे उपविभागीय अभियंता यांना निवेदन सादर केले होते. मात्र पाणी देण्यात आले नाही.
हाती येणारे पिक डोळ्यादेखत करपत असल्याचे बघून संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी आज सिताराम टेंभूर्णे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. गोगांव उपसा सिंचन योजनेतून तत्काळ पाणीपुरवठा करण्यात यावा, अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल, असाही इशारा शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी व सबंधित शेतकऱ्यांनी दिला. जिल्हाधिकाऱ्यांनी उद्या ६ ऑक्टोंबर रोजी पाणीपुरवठा करण्यात येईल, असे आश्वासन दिले.
यावेळी सिताराम टेंभूर्णे, लोमेश लाडे, भास्कर मुनघाटे, केवळराम नंदेश्वर, रमेश वनकर, तुळशीराम मानकर, भगवान गेडाम, दिवाकर राउत, हिरामण उंदीरवाडे, तुळशीराम मेश्राम, कृष्णानंद भरडकर, चंद्रशेखर भरडकर, बापूजी दिवटे, मारोती दिकोंडावार, महेश ठोंबरे, शामराव चिचघरे, सुनिल बांगरे, दिवाकर बंगारे, धरमदास म्हशाखेत्री, मीना बाबनवाडे, विजय म्हशाखेत्री, नानाजी चौधरी, देवानंद चुधरी, नामदेव खोब्रागडे, शशीकला भरडकर, रविंद्र मानकर, गणेश पालीवाल, सचिन चौधरी, किशोर मुनघाटे, शंकर दिवटे, मधुकर चौधरी यांच्यासह गोगांव येथील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.  Print


News - Gadchiroli | Posted : 2018-10-05


Related Photos