भौतिक सोयी - सुविधा, शैक्षणिक गुणवत्तेवर शाळांचा दर्जा ठरणार : जिल्हाधिकारी शेखर सिंह


- आरमोरी येथे समन्वय कार्यशाळा
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / ठाणेगाव / आरमोरी
: गडचिरोली जिल्ह्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील मुख्याध्यापकांनी शाळेतील भौतिक सोयी - सुविधा आणि भौतिक सुविधांवर भर देण्याची गरज आहे. याच आधारावर शाळांचा दर्जा ठरणार आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले.
आज ४ आॅक्टोबर रोजी आरमोरी येथील महात्मा गांधी महाविद्यालयात शिक्षण विभाग जि.प. गडचिरोली, जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघ व शिक्षकेत्तर संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित समन्वय कार्यशाळेचे उद्घाटक म्हणून जिल्हाधिकारी शेखर सिंह बोलत होते. सदर कार्यशाळा ६ आॅक्टोबरपर्यंत राहणार आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मनोहरभाई शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष किशोर वनमाळी होते. प्रमुख अतिथी म्हणून जि.प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. विजय राठोड, उपविभागीय अधिकारी मेश्राम, तहसीलदार यशवंत धाईत, शिक्षणाधिकारी रमेश उचे, संवर्ग विकास अधिकारी हेमलता परसा, प्रभारी गटशिक्षणाधिकारी पितांबर कोडापे, जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष संजय नार्लावार, शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेचे महाराष्ट कार्यवाह अविनाश चडगुलवार, प्राचार्य डाॅ. खालसा आदी मान्यवर उपस्थित होते. 
पुढे बोलताना जिल्हाधिकारी शेखर सिंह म्हणाले, प्रत्येक शाळेत १०० टक्के विद्युतीकरण असावे. जिल्ह्यातील प्रत्येक शाळेतील विद्यार्थी अ श्रेणीत येण्यासाठी मुख्याध्यापकांनी परिपूर्ण प्रयत्न करावेत. माझी शाळा सर्वोत्कृष्ट झाली पाहिजे यासाठी सर्वांनी एकमताने ठरवायचे आहे. शासनाकडे कोणत्याही मुख्याध्यापकांनी चुकीची माहिती सादर करू नये, मिसींग विद्यार्थ्यांवर जास्त भर देण्यात यावा, अध्ययन स्तर निश्चिती व आकांक्षित जिल्हा यामध्ये जिल्ह्यातील शाळांचा प्रगती दर्जा वाढविण्यासाठी प्रयत्न करावा, जिल्ह्यातील आश्रमशाळांची प्रगती सुधारण्यासाठी मुख्याध्यापकांनी प्रयत्न करावेत. या सर्व बाबींची पूर्तता करण्यासाठी हे प्रशिक्षण असून यामधून योग्य बाबींचे सर्वांनी पालन करावे असे आवाहन केले.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. विजय राठोड , किशोर वनमाळी यांनीही मार्गदर्शन केले. प्रास्ताविक शिक्षणाधिकारी रमेश उचे यांनी केले. संचालन प्रा. प्रकाश बगमारे यांनी केले तर आभार चडगुलवार यांनी मानले. प्रशिक्षणाला जिल्ह्यातील सर्वच मुख्याध्यापक उपस्थित होते.

   Print


News - Gadchiroli | Posted : 2018-10-04


Related Photos