महत्वाच्या बातम्या

 बाबूपेठमध्ये मुक्या वन्यजीवाचा निर्घृण अंत : अजगराला ठार मारणाऱ्या दोघांना अटक


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : निसर्गाच्या सान्निध्यात मुक्तपणे वावरणाऱ्या मुक्या वन्यजीवांवर माणसाकडून होणारे अत्याचार पुन्हा एकदा समोर आले आहेत. बाबूपेठ परिसरात अनुसूची-१ मधील संरक्षित वन्यप्राणी असलेल्या अजगराला (Indian Rock Python) ठार मारून त्याची अवैधरित्या हाताळणी करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या अमानुष कृत्याचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर प्रसारित झाल्यानंतर वनविभागाने घटनेची गंभीर दखल घेत तातडीने तपास सुरू केला. या प्रकरणात दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.

सुरेश चेलू राठोड (३३ वर्षे) आणि संदीप मारुती वाघमारे (३० वर्षे) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी वनगुन्हा क्रमांक ०९१६२/२२९०४७/२०२६, १९ नोव्हेंबर २०२६ रोजी नोंदविण्यात आला. मुख्य वनसंरक्षक (प्रा.) चंद्रपूर आर. एम. रामानुजन आणि विभागीय वन अधिकारी राजन तलमले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक वनसंरक्षक विकास तरसे, वनपरिक्षेत्र अधिकारी घनश्याम नायगमकर, वनपाल डोंगरे आणि वनरक्षक प्रियंका ब्राम्हणकर यांच्या पथकाने तपासाची चक्रे वेगाने फिरवत दोन्ही आरोपींना अटक केली.

दोन्ही आरोपींना चंद्रपूर न्यायालयात हजर करण्यात आले असता त्यांची २ डिसेंबर २०२६ पर्यंत न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

अजगरासारखे वन्यजीव पर्यावरणातील नैसर्गिक समतोल राखण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. मात्र, अशा मुक्या जीवांचा जीव घेण्याच्या घटना वन्यजीव संरक्षणापुढे गंभीर प्रश्न निर्माण करणाऱ्या आहेत. वन्यजीवांना त्रास देणे, त्यांना ठार मारणे अथवा त्यांची अवैधरित्या हाताळणी करणे हा वन्यजीव (संरक्षण) अधिनियम १९७२ अंतर्गत गंभीर गुन्हा आहे. या कायद्यानुसार दोषींना किमान तीन ते सात वर्षांपर्यंत कारावास आणि दंडाची तरतूद आहे.

वन्यप्राणी दिसल्यास त्यांना मारण्याचा किंवा स्वतःहून पकडण्याचा प्रयत्न करू नये. अशा वेळी वनविभागाला तातडीने माहिती द्यावी, असे आवाहन विभागीय वन अधिकारी राजन तलमले यांनी केले आहे. मुक्या वन्यजीवांचाही या निसर्गावर तेवढाच अधिकार आहे, याची जाणीव ठेवून त्यांचे संरक्षण करणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे.





  Print






Related Photos