महत्वाच्या बातम्या

 नवजात बालकांच्या संगोपनासह नियमित पुनर्तपासणीवर भर


- राष्ट्रीय नवजात शिशू सप्ताहानिमित्त जिल्हा महिला व बाल रुग्णालयात मार्गदर्शन; पहिले २८ दिवस बालकांच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचे

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : नवजात बालकांचे आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी जन्मानंतरच्या पहिल्या २८ दिवसांत विशेष काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. विशेषतः अकाली जन्मलेली, जन्मतः कमी वजन असलेली तसेच आजारी बालके यांच्याकडे अधिक लक्ष देण्याची गरज असून, रुग्णालयातून घरी सोडल्यानंतरही त्यांच्या आरोग्याची नियमित वैद्यकीय पुनर्तपासणी करणे महत्त्वाचे आहे. यासोबतच योग्य पोषण, केवळ स्तनपान, नियमित लसीकरण आणि कुटुंबाचा सक्रिय सहभाग यामुळे बालकांचे आरोग्य सुदृढ राखण्यास मदत होते, असे मार्गदर्शन राष्ट्रीय नवजात शिशू सप्ताहानिमित्त आयोजित कार्यक्रमात करण्यात आले.

जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. रवी गावंडे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा महिला व बाल रुग्णालय, गडचिरोली येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे उद्घाटन रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. माधुरी किलनाके यांच्या हस्ते करण्यात आले. दरवर्षी १५ ते २१ नोव्हेंबर या कालावधीत राष्ट्रीय नवजात शिशू सप्ताह साजरा केला जातो. यंदाच्या सप्ताहाची संकल्पना ‘लहान बाळे, मोठी क्षमता; त्यांचे भविष्य सुरक्षित ठेवण्यासाठी पाठपुरावा सेवेत गुंतवणूक करा’ अशी आहे. नवजात बालकांचे आरोग्य जपण्याबरोबरच त्यांना जन्मानंतर आवश्यक असणाऱ्या आरोग्यसेवा, नियमित तपासणी आणि उपचारांची सातत्यपूर्ण उपलब्धता सुनिश्चित करण्यावर या सप्ताहात विशेष भर देण्यात येत आहे.

यावेळी मार्गदर्शन करताना वैद्यकीय अधीक्षक डॉ. माधुरी किलनाके यांनी मुलींच्या आरोग्य आणि पोषणाची काळजी किशोरवयापासूनच घेणे आवश्यक असल्याचे सांगितले. निरोगी माता आणि सुदृढ बालकासाठी गर्भधारणेपूर्वीपासूनच आरोग्यविषयक जागरूकता असणे गरजेचे आहे. गर्भवती महिलांनी प्रसूतीपूर्व काळात तसेच प्रसूतीनंतर सकस व संतुलित आहार घेणे आवश्यक आहे. नवजात बालकाच्या योग्य वाढीसाठी केवळ स्तनपानाचे महत्त्व असून, माता आणि बालकाच्या आरोग्याची जबाबदारी केवळ आईपुरती मर्यादित न ठेवता कुटुंबातील सर्व सदस्यांनी त्यात सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

वरिष्ठ बालरोगतज्ज्ञ डॉ. संजय करपते यांनी नवजात बालकांच्या जन्मानंतरच्या पहिल्या २८ दिवसांचे महत्त्व स्पष्ट केले. हा कालावधी बालकाच्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील असतो. या काळात बालकाच्या प्रकृतीतील बदल, आजाराची लक्षणे किंवा अन्य धोक्याची चिन्हे वेळेत ओळखणे आवश्यक आहे. बालकाची प्रकृती गंभीर असल्यास विलंब न करता योग्य रुग्णालयात पुढील उपचारांसाठी संदर्भ सेवा घेणे गरजेचे आहे. तसेच रुग्णालयातून घरी पाठविल्यानंतर बालकाच्या आरोग्यस्थितीनुसार नियमित वैद्यकीय पुनर्तपासणी करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

थंडीच्या दिवसांत नवजात, कमी वजनाची आणि आजारी बालके यांची विशेष काळजी घेण्याची गरज असल्याचेही कार्यक्रमात सांगण्यात आले. अशा बालकांना थंडीपासून संरक्षण देऊन उबदार ठेवणे महत्त्वाचे आहे. त्याचबरोबर बालकांचे वेळापत्रकानुसार नियमित लसीकरण करून घेणे आवश्यक आहे. जन्मजात दोष आढळलेल्या बालकांसाठी जिल्हा शीघ्र हस्तक्षेप केंद्राच्या (DEIC) माध्यमातून उपलब्ध असलेल्या तपासणी, मार्गदर्शन आणि उपचारविषयक सेवांची माहितीही उपस्थितांना देण्यात आली.

कार्यक्रमादरम्यान नवजात बालकांची काळजी, स्तनपान, पोषण, धोक्याची लक्षणे ओळखणे, लसीकरण आणि नियमित पुनर्तपासणी या विषयांवर दृकश्राव्य माध्यमे व माहितीपर साहित्याच्या साहाय्याने जनजागृती करण्यात आली. माता, कुटुंबीय आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनी नवजात बालकांच्या आरोग्यविषयक बाबींमध्ये जागरूक राहण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. या कार्यक्रमाला डॉ. नीलकंठ मसराम, वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय कन्नमवार, सहाय्यक अधिसेविका कविता पोतराजवार यांच्यासह रुग्णालयातील अधिकारी, परिचारिका, कर्मचारी, परिचर्या प्रशिक्षणार्थी, रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रतिज्ञा रामटेके यांनी केले. 

नवजात बालकांचे आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी जन्मानंतरची योग्य देखभाल, वेळेवर उपचार आणि नियमित पुनर्तपासणी या बाबी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. पालकांसह संपूर्ण कुटुंबाने बालकांच्या आरोग्याबाबत सजग राहिल्यास बालमृत्यू रोखण्यास आणि बालकांच्या निरोगी भविष्याची पायाभरणी करण्यास निश्चितच मदत होऊ शकते, हा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.





  Print






Related Photos