महत्वाच्या बातम्या

 कावडी पारधी बेड्यावर शासकीय कागदपत्रांसाठी विशेष सेवा शिबिर जनजातीय गौरव दिवस सेवा सप्ताह


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा : क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त आयोजित जनजातीय गौरव दिवस सेवा सप्ताह अभियानांतर्गत आर्वी तालुक्यातील कावडी पारधी बेडा येथे विशेष सेवा शिबिराचे आयोजन करण्यात आले. पारधी समाजातील नागरिकांना विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक असलेली कागदपत्रे सहज उपलब्ध व्हावीत तसेच कागदपत्रांअभावी कोणताही पात्र लाभार्थी शासकीय योजनांपासून वंचित राहू नये, या उद्देशाने सदर शिबिराचे आयोजन करण्यात आले.

या शिबिरामध्ये नागरिकांना आधारकार्ड, रेशन कार्ड, उत्पन्नाचा दाखला तसेच इतर आवश्यक शासकीय कागदपत्रांसंदर्भात मार्गदर्शन व सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या. संबंधित कागदपत्रांसाठी आवश्यक अर्ज प्रक्रिया, कागदपत्रांची पूर्तता व शासकीय सेवांबाबत नागरिकांना माहिती देण्यात आली.

शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविणे, विशेषतः पारधी समाजातील वंचित घटकांना शासकीय यंत्रणेशी जोडणे आणि त्यांना आवश्यक कागदपत्रे उपलब्ध करून देऊन विकासाच्या मुख्य प्रवाहात आणणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे.

जनजातीय गौरव दिवस सेवा सप्ताहाच्या माध्यमातून आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी विविध लोकाभिमुख उपक्रम राबविण्यात येत असून, अशा सेवा शिबिरांमुळे दुर्गम व वंचित भागातील नागरिकांना शासकीय सेवा त्यांच्या जवळ उपलब्ध होण्यास मदत होत आहे.ह, असे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाने कळविले आहे.





  Print






Related Photos