गडचिरोली जिल्ह्यात आज २ जुलैपर्यंत कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांचा आकडा पोहचला ७२ वर : उपचारानंतर ५८ जणांना दवाखान्यातून मिळाला डिस्चार्ज


- ७०८९ पैकी ६८९९ जणांचे नमुने कोरोना निगेटीव्ह, ११८ जणांचा अहवाल येणे बाकी
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : सध्या गडचिरोली जिल्ह्यात बाहेर राज्यातून व जिल्ह्यातून आलेल्या बहुतांशी रुग्णांचे नमुने कोरोना निगेटीव्ह येत असले तरीमात्र दिवसेंदिवस कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांचा आकडा वाढत असल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यात आज, २ जुलैपर्यंत कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांचा आकडा ७२ वर पोहचला आहे. यापैकी आतापर्यंत ५८ रुग्ण उपचाराने बरे झाल्याने त्यांना दवाखान्यातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. सद्या कोरोना ॲक्टिव्ह रुग्ण १३ असून दवाखान्यात १३ जण उपचार घेत आहेत. आज ८९६ जणांना संस्थात्मक विलगीकरणात घेण्यात आले आहे. एकूण ७०८९ जणांचे नमुने तपासण्यात आले असून त्यापैकी ६८९९ नमुने निगेटीव्ह आले आहेत. ११८ नमुन्यांचा अहवाल येणे बाकी आहे. आज ११८ नमुने तपासणीसाठी घेण्यात आले आहेत. जिल्ह्यातील सक्रिय प्रतिबंधात्मक क्षेत्र ५ आहेत. आतापर्यंत एकाचा जिल्ह्याबाहेर मृत्यू झाला आहे. दुबार तपासणीसाठी ४५७ नमुने घेण्यात आले असून टु नॅटवरील नमुने ३६२ आहेत. सध्या गडचिरोली जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्ण उपचाराने बरे होत असले तरी कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी नागरिकांनी विशेष खबरदारी घेत अत्यावश्यक कामे वगळता घराबाहेर जाणे टाळावे, असे आवाहन गडचिरोली जिल्हा आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे.
वडसा, कोरची, मुलचेरा, सिरोंचा, एटापल्ली, भामरागड तालुके झाले कोरोनामुक्त
बाहेर राज्यातून व जिल्ह्यातून गडचिरोली जिल्ह्यात आलेल्या कामगार, विद्यार्थी व नागरिकांमुळे गडचिरोली जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्ण आढळून आले. मात्र उपचारानंतर कोरोना बाधित रुग्ण बरे होत असल्याने दवाखान्यातून त्यांना डिस्चार्ज देत स्वगृही पोहचविण्यात येत आहे. आतापर्यंत गडचिरोली जिल्ह्यातील वडसा, कोरची, मुलचेरा, सिरोंचा, एटापल्ली, भामरागड हे तालुके कोरोनामुक्त झाले असून इतर तालुक्यातील रुग्ण बरे होत असल्याने त्या तालुक्याची कोरोना मुक्तीकडे वाटचाल सुरू असल्याचे दिसून येत आहे. गडचिरोली जिल्ह्यातील ७२ कोरोना बाधित रुग्णांपैकी ५८ जण कोरोनामुक्त झाले असून सध्या १३ जण सक्रिय कोरोना बाधित असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे. दिवसेंदिवस जिल्ह्यात कोरोना बाधित आढळून आलेल्यांपैकी बरेचजण उपचारानंतर बरे होत आहेत. तसेच जिल्ह्यातील बहुतांशी कोरोना अहवाल निगेटीव्ह येत असल्याने गडचिरोली जिल्हावासियांना मोठा दिलासा मिळाला आहे.
News - Gadchiroli | Posted : 2020-07-02