महत्वाच्या बातम्या

 जिल्हा दक्षता व संनियंत्रण समितीच्या कामकाजाचा जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / भंडारा : जिल्हा दक्षता व संनियंत्रण समितीच्या बैठकीत जिल्हाधिकारी सावन कुमार यांनी समितीच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला. अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत दाखल प्रकरणे, पीडितांना देण्यात येणारी आर्थिक मदत आणि प्रलंबित प्रकरणांच्या निपटाऱ्याबाबत यावेळी चर्चा करण्यात आली.

अत्याचारग्रस्तांना शासनाच्या नियमानुसार आर्थिक मदत विहित वेळेत उपलब्ध करून द्यावी. प्रलंबित प्रकरणांचा संबंधित विभागांनी परस्पर समन्वयातून पाठपुरावा करून तातडीने निपटारा करावा. तसेच पीडित व्यक्ती व त्यांच्या कुटुंबीयांना आवश्यक सहकार्य आणि संरक्षण मिळेल, याची दक्षता घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी सावन कुमार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

समितीच्या माध्यमातून पीडितांना न्याय मिळवून देणे, त्यांच्या हक्कांचे संरक्षण करणे आणि सामाजिक न्यायाची प्रभावी अंमलबजावणी करणे ही सर्व संबंधित यंत्रणांची जबाबदारी आहे. त्यामुळे या प्रकरणांमध्ये संवेदनशीलतेने व जबाबदारीने कार्यवाही करावी, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट, अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध घालण्यासाठी व त्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी अधिनियम, २०१३ अंतर्गत भंडारा जिल्ह्यात दोन गुन्हे दाखल झाल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. बैठकीला जिल्हा दक्षता व संनियंत्रण समितीच्या आयुक्त आशा कवाडे, जिल्हा परिषदेचे  एस. एन. गडमडे,  डॉ. नितीन वानखेडे, रविंद्र रणदिवे तसेच समितीचे सर्व सदस्य उपस्थित होते.





  Print






Related Photos