गडचिरोलीत अत्याधुनिक कीटकशास्त्रीय फील्ड लॅबोरेटरीचे उद्घाटन

- कीटकजन्य आजारांच्या निर्मूलनासाठी आयएमएक्स-नेट राष्ट्रीय प्रकल्पाचा शुभारंभ; मलेरिया, हत्तीरोग व डेंग्यू नियंत्रणाला मिळणार बळ
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : जिल्ह्यातील कीटकजन्य आजारांचे प्रभावी नियंत्रण आणि निर्मूलन करण्याच्या दृष्टीने आरोग्य विभागाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. गडचिरोली तालुक्यातील वाकडी उपकेंद्र येथे अत्याधुनिक कीटकशास्त्रीय फील्ड लॅबोरेटरीचे (Entomological Field Laboratory) उद्घाटन मंगळवारी करण्यात आले. यासोबतच कीटकजन्य आजारांच्या नियंत्रणासाठी केंद्र शासनाच्या आरोग्य व संशोधन विभागांतर्गत राबविण्यात येणाऱ्या राष्ट्रीय एकात्मिक आण्विक झेनोमॉनिटरिंग नेटवर्क (IMX-Net Integrated Molecular Xenomonitoring National Network) या महत्त्वपूर्ण राष्ट्रीय प्रकल्पाचाही शुभारंभ करण्यात आला.
या प्रसंगी प्रकल्पाची सविस्तर माहिती देणाऱ्या फलकाचे तसेच प्रकल्प आराखड्याचे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. या प्रयोगशाळेमुळे गडचिरोली जिल्ह्यातील हिवताप (मलेरिया), हत्तीरोग (फायलेरिया), डेंग्यू यांसारख्या कीटकजन्य आजारांच्या नियंत्रणासाठी आधुनिक वैज्ञानिक तंत्रज्ञानाचा वापर करणे शक्य होणार आहे.
आयएमएक्स-नेट प्रकल्पांतर्गत डासांच्या विविध प्रजातींचा अभ्यास, त्यांची संख्या व प्रसाराचे निरीक्षण तसेच डासांमध्ये रोगकारक जंतूंचे अस्तित्व आण्विक स्तरावर तपासले जाणार आहे. या प्रक्रियेला झेनोमॉनिटरिंग असे म्हणतात. त्यामुळे रोगप्रसार करणाऱ्या डासांच्या प्रजातींची अचूक ओळख करून संभाव्य रोगप्रसाराचा धोका वेळीच लक्षात घेता येणार आहे. तसेच स्थानिक पातळीवरच कीटकशास्त्रीय नमुन्यांची तपासणी करता येणार असल्याने निदान प्रक्रियेला गती मिळणार आहे.
गडचिरोली हा दुर्गम आणि आदिवासीबहुल जिल्हा असल्याने येथे कीटकजन्य आजारांचे नियंत्रण हे आरोग्य यंत्रणेसमोरील महत्त्वाचे आव्हान आहे. या पार्श्वभूमीवर आधुनिक तंत्रज्ञान, शास्त्रीय संशोधन आणि प्रभावी सर्वेक्षण यांची सांगड घालणे आवश्यक आहे. नव्याने सुरू झालेल्या प्रयोगशाळेमुळे रोगप्रसाराची कारणे आणि परिस्थितीचा शास्त्रीय पद्धतीने अभ्यास करता येईल. त्याआधारे प्रतिबंधात्मक उपाययोजना अधिक प्रभावीपणे आणि वेळेत राबविणे शक्य होणार आहे.
या उद्घाटन सोहळ्याला जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रताप शिंदे, आयसीएमआर-एनआयव्हीसीआर, पॉंडिचेरीच्या संचालक व शास्त्रज्ञ जी डॉ. मंजू राही, गेट्स फाउंडेशन इंडियाचे एनटीडी कार्यक्रम अधिकारी डॉ. विशाल डोग्रा, आयसीएमआर-एनआयव्हीसीआरचे शास्त्रज्ञ ई डॉ. ए. एन. श्रीराम, टीसीआय फाऊंडेशनचे कीटकशास्त्रज्ञ डॉ. लक्ष्मण कानेकर, सहायक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रफुल्ल गोरे आणि जिल्हा व्हीबीडी सल्लागार राजेश कार्लेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी वाकडी उपकेंद्रातील आरोग्य अधिकारी, कर्मचारी, स्थानिक आरोग्य सेवक तसेच राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमाचे (NVBDCP) प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या अत्याधुनिक प्रयोगशाळेमुळे कीटकजन्य आजारांचे सर्वेक्षण, अचूक निदान आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांना वैज्ञानिक आधार मिळणार असून, गडचिरोली जिल्ह्याला मलेरिया, हत्तीरोग आणि डेंग्यूसारख्या आजारांपासून मुक्त करण्याच्या मोहिमेला अधिक गती मिळेल, असा विश्वास आरोग्य विभागाच्या वतीने व्यक्त करण्यात आला.




Petrol Price




