भद्रावतीत अवैध रेती वाहतुकीवर एलसीबीचा छापा : २०.१० लाखांचा टिप्पर व रेती जप्त


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात अवैध गौण खनिज वाहतुकीविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई करीत रेतीची चोरटी वाहतूक करणारा टाटा हाफटन टिप्पर जप्त केला. १८ नोव्हेंबर रोजी भद्रावती पोलीस ठाण्याच्या हद्दीत करण्यात आलेल्या या कारवाईत २० लाख रुपये किमतीचा टिप्पर आणि १० हजार रुपये किमतीची दोन ब्रास रेती असा एकूण २० लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला भद्रावती परिसरात अवैधरित्या गौण खनिजाची वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पथकाने नाकाबंदी करून संशयित टिप्परची तपासणी केली. यावेळी टिप्परमधून दोन ब्रास रेतीची अवैधरित्या वाहतूक होत असल्याचे आढळून आले. पोलिसांनी टिप्परसह रेती जप्त करून चालक तथा मालक ऋषिकेश बंडू गोरे २९ वर्ष , रा. खापरी वॉर्ड, शारदा माता मंदिराजवळ, भद्रावती याच्याविरुद्ध कारवाई केली.
याप्रकरणी भद्रावती पोलीस ठाण्यात अप. क्र. १०७६/२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) तसेच जमीन महसूल कायद्याच्या कलम ४८(७), ४८(८) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वाखाली उपविभाग राजुरा पथकाने केली.




Petrol Price




