प्रारूप मतदार यादीत नाव नसलेल्या मतदारांना नाव समाविष्ट करण्याची पुन्हा संधी


- पात्र मतदारांनी गणना प्रपत्र व आवश्यक निवेदन सादर करावे – जिल्हाधिकारी वसुमना पंत यांचे आवाहन
विदर्भ न्यूज एक्सपरीस
प्रतिनिधी / चंद्रपूर : विशेष सखोल पुनरीक्षण (SIR-२०२६) प्रक्रियेदरम्यान अनुपस्थित, स्थलांतरित, मृत किंवा दुबार म्हणून नोंद झाल्यामुळे प्रारूप मतदार यादीत नावे समाविष्ट होऊ न शकलेल्या पात्र मतदारांना अंतिम मतदार यादीत नाव समाविष्ट करून घेण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने पुन्हा एक संधी उपलब्ध करून दिली आहे. संबंधित मतदारांनी आवश्यक गणना प्रपत्र व निवेदन सादर करून या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी वसुमना पंत यांनी केले आहे.
भारत निवडणूक आयोगाच्या ६ नोव्हेंबर २०२६ रोजीच्या निर्देशानुसार, विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेत ज्या मतदारांना गणना प्रपत्र वितरित करण्यात आले होते, मात्र विविध कारणांमुळे त्यांची नावे प्रारूप मतदार यादीत समाविष्ट होऊ शकली नाहीत, अशा मतदारांची मतदान केंद्रनिहाय यादी पुन्हा प्रसिद्ध करण्यात येणार आहे. ही यादी संबंधित मतदान केंद्रांचे सूचना फलक, ग्रामपंचायत कार्यालये, नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांची कार्यालये तसेच संबंधित निवडणूक अधिकाऱ्यांच्या कार्यालयांमध्ये उपलब्ध करून देण्यात येईल. याशिवाय मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या संकेतस्थळावरही ही यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
मतदारांनी अशी करावी कार्यवाही -
प्रारूप मतदार यादीत नाव नसलेल्या संबंधित मतदारांनी भरलेले व स्वाक्षरी केलेले गणना प्रपत्र मतदार नोंदणी अधिकारी (ERO), सहायक मतदार नोंदणी अधिकारी (AERO) किंवा मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांच्याकडे सादर करावे.
ज्या मतदारांचे वास्तव्य पूर्वीच्या पत्त्यावरच आहे, त्यांनी गणना प्रपत्रासोबत परिशिष्ट-B मधील निवेदन सादर करावे. या निवेदनात यापूर्वी गणना प्रपत्र सादर न करण्याचे कारण नमूद करणे आवश्यक आहे.
राज्यांतर्गत स्थलांतर केलेल्या मतदारांनी नवीन पत्ता व विधानसभा मतदारसंघाचा तपशील नमूद करून गणना प्रपत्रासोबत परिशिष्ट-C मधील निवेदन आणि नवीन पत्त्याचा पुरावा सादर करावा. अशा मतदारांना स्वतंत्रपणे नमुना क्रमांक ८ (Form-८) सादर करण्याची आवश्यकता नाही.
मतदारांना त्यांच्या पूर्वीच्या मतदार छायाचित्र ओळखपत्राचा (EPIC) क्रमांक वापरून भारत निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावरून किंवा ECINET ॲपद्वारे गणना प्रपत्र डाउनलोड करून सादर करता येणार आहे. तसेच मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्यासाठी Book a Call with BLO ही सुविधादेखील उपलब्ध आहे.
विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेदरम्यान नवीन मतदार नोंदणीसाठी ज्यांनी यापूर्वीच नमुना क्रमांक ६ (Form-६) सादर केला आहे, अशा मतदारांना पुन्हा गणना प्रपत्र सादर करण्याची आवश्यकता नाही.
पात्र मतदारांच्या नावांचा अंतिम यादीत समावेश -
संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांमार्फत अशा मतदारांशी संपर्क साधून त्यांना आवश्यक मार्गदर्शन व गणना प्रपत्र उपलब्ध करून देण्यात येणार आहे. प्राप्त अर्जांची नियमानुसार तपासणी व पडताळणी केल्यानंतर पात्र मतदारांची नावे अंतिम मतदार यादीत समाविष्ट करण्याची कार्यवाही करण्यात येईल.
कोणताही पात्र मतदार मतदानाच्या हक्कापासून वंचित राहू नये, यासाठी प्रारूप मतदार यादीत आपले नाव आहे किंवा नाही, याची खात्री करून घ्यावी. नाव समाविष्ट नसल्यास आवश्यक कागदपत्रांसह गणना प्रपत्र विहित पद्धतीने सादर करावे. जिल्ह्यातील सर्व संबंधित पात्र मतदारांनी निवडणूक आयोगाने उपलब्ध करून दिलेल्या या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी वसुमना पंत यांनी केले आहे.




Petrol Price




