महत्वाच्या बातम्या

 कोंबड्यांच्या झुंजीवर पैशांचा जुगार : बल्लारपूर पोलिसांचा येनबोडी शेतशिवारात छापा, तिघे पकडले


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / बल्लारपूर : येनबोडी गावालगतच्या शेतशिवारात कोंबड्यांच्या झुंजीवर पैशांची बाजी लावून सुरू असलेल्या जुगारावर बल्लारपूर पोलिसांनी छापा टाकला. १७ नोव्हेंबर रोजी करण्यात आलेल्या या कारवाईत तिघांना पकडण्यात आले असून, घटनास्थळावरून चार कोंबडे, कोंबड्यांच्या पायातील दोन काती आणि रोख रक्कम असा एकूण ३ हजार ८२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांच्या छाप्यामुळे जुगार खेळणाऱ्यांमध्ये एकच धावपळ उडाली.

या प्रकरणात अशोक महादेव हनमंते ५५ वर्ष रा. सोमेश्वर मंदिराजवळ, वार्ड क्रमांक ३, राजुरा, संतोष उद्धव मोरे ५४ वर्ष , रा. कळमना, ता. बल्लारपूर आणि कुणाल अनिल लोळे २६वर्ष, रा. पळसगाव, ता. गोंडपिपरी, जि. चंद्रपूर यांना पोलिसांनी पकडले. तर बालू काळे, रा. कळमना हा घटनास्थळावरून पसार झाला. शेतशिवारात काही जण कोंबड्यांच्या झुंजीवर ५०० रुपयांची पैज लावून हार-जीतचा जुगार खेळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. माहितीच्या आधारे पोलिसांनी घटनास्थळी धाड टाकली. यावेळी काही जण हातातील कोंबडे घेऊन शेतशिवारातून पळून गेले, तर तिघे पोलिसांच्या हाती लागले. त्यांची अंगझडती घेतली असता रोख रक्कम आढळून आली.

घटनास्थळावर मिळालेले चार कोंबडे आणि कोंबड्यांच्या पायातील दोन कातीही जप्त करण्यात आल्या. याप्रकरणी संबंधित आरोपींविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्याच्या कलम १२ (ब) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. सदर कारवाई पोलीस निरीक्षक बिपिन इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक अनिल राऊत यांचा नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक उमेश जोगदंड, पोलीस हवालदार सत्यवान कोटनाके, विकास जुमनाके, पोलीस अंमलदार महेश कुकूडकार, वैभव गाडगे, शरदचंद्र कारूश, मिलिंद आत्राम आणि संदीप थेरे यांनी केले.





  Print






Related Photos