महत्वाच्या बातम्या

 रोजगार मेळावे व प्लेसमेंट ड्राइव्ह स्थगित


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा : कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या वतीने पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार महाकुंभ-महाराष्ट्र अंतर्गत वर्धा जिल्ह्यात  २९ सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आलेले रोजगार मेळावे व प्लेसमेंट ड्राइव्ह स्थगित करण्यात आले आहेत. भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधान परिषदेच्या नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला असून संबंधित क्षेत्रात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. आचारसंहितेच्या नियमावलीचा भंग होऊ नये, यासाठी वर्धा जिल्ह्यात २९ सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आलेले सर्व रोजगार मेळावे व प्लेसमेंट ड्राइव्ह स्थगित करण्यात येत असल्याचे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, वर्धा यांच्याकडून कळविण्यात आले आहे.

जिल्ह्यात एकूण ११ ठिकाणी रोजगार मेळावे व प्लेसमेंट ड्राइव्ह आयोजित करण्यात येणार होते. यामध्ये अनेकांत स्वाध्याय मंदिर, रामनगर, वर्धा; कला वाणिज्य महाविद्यालय, आर्वी; आर. व्ही. परणकर अभियांत्रिकी तथा तंत्रज्ञान महाविद्यालय, आर्वी; लोकमान्य महाविद्यालय, आष्टी; मॉडेल हायस्कूल, कारंजा; हरदयाल औद्योगिक प्रशिक्षण संस्था, पुलगाव; रामदासजी तडस खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था, देवळी; रा. स. बिडकर महाविद्यालय, हिंगणघाट; लघु उद्योग भारती (श्याम बाबा ट्रेडर्स), हिंगणघाट; विद्याविकास महाविद्यालय, समुद्रपूर आणि डॉ. आर. जी. भोयर महाविद्यालय, सेलू या ठिकाणांचा समावेश आहे.

या सर्व ठिकाणी २९ सप्टेंबर रोजी होणारे रोजगार मेळावे व प्लेसमेंट ड्राइव्ह स्थगित करण्यात आले आहेत. पुढील आयोजनाबाबतची माहिती संबंधित विभागामार्फत देण्यात येईल. अधिक माहितीसाठी किंवा काही अडचण असल्यास जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, प्रशासकीय इमारत, तिसरा मजला, सिव्हिल लाईन, वर्धा येथे संपर्क साधावा. तसेच ०७१५२-२४२७५६ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.





  Print






Related Photos