गडचिरोलीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील आरोग्यसेवा सुधारावी


- नवनियुक्त अधिष्ठाता डॉ. राजेंद्र सुरपाम यांचे स्वागत करून कुणाल पेंदोरकर यांनी मांडल्या विविध समस्या
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील आरोग्यसेवा अधिक सक्षम करून रुग्णांना दर्जेदार व वेळेवर उपचार मिळावेत, तसेच रुग्णालयातील विविध समस्या तातडीने सोडविण्यात याव्यात, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश असंघटित कामगार कर्मचारी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कुणाल पेंदोरकर यांनी केली.
गडचिरोली येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता पदाचा अतिरिक्त कार्यभार चंद्रपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील सूक्ष्मजीवशास्त्र विभागाचे प्राध्यापक डॉ. राजेंद्र सुरपाम यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. यानिमित्त पेंदोरकर यांनी डॉ. सुरपाम यांची भेट घेऊन त्यांचे स्वागत केले. यावेळी त्यांनी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील विविध समस्या, रुग्णसेवा, वैद्यकीय सुविधा तसेच प्रशासनाशी संबंधित अनेक महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा केली.
यावेळी पेंदोरकर यांनी सांगितले की, गडचिरोली येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू झाल्यापासून प्रशासनाच्या कार्यपद्धतीबाबत विविध स्तरांतून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. वैद्यकीय महाविद्यालयाच्या पायाभूत सुविधा, मनुष्यबळ, कंत्राटी कर्मचारी भरती, विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या सुविधा तसेच रुग्णसेवा अशा विविध मुद्द्यांवर प्रशासन टीकेच्या केंद्रस्थानी राहिले आहे.
विशेषत जिल्हा सामान्य रुग्णालयातील रुग्णसेवेशी संबंधित समस्यांकडे तातडीने लक्ष देण्याची गरज असल्याचे पेंदोरकर यांनी अधिष्ठाता डॉ. सुरपाम यांच्या निदर्शनास आणून दिले. रुग्णालयातील काही महत्त्वाची तपासणी यंत्रे बंद अवस्थेत असल्याने रुग्णांना आवश्यक तपासण्यांसाठी खासगी रुग्णालये व निदान केंद्रांकडे धाव घ्यावी लागत आहे. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांवर अतिरिक्त आर्थिक भार पडत असल्याचे त्यांनी सांगितले.
याशिवाय रुग्णालयात काही आवश्यक औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध नसल्याने रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना औषधे बाहेरून खरेदी करावी लागत असल्याची बाबही त्यांनी मांडली. शासकीय रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या गोरगरीब रुग्णांना शक्य तितक्या सर्व आवश्यक सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देणे गरजेचे असल्याचे पेंदोरकर यांनी स्पष्ट केले.
जिल्हा सामान्य रुग्णालयातील विविध विभागांमध्ये तज्ज्ञ डॉक्टरांची नियुक्ती करण्यात आली असली, तरी काही डॉक्टर नियमितपणे उपस्थित राहत नसल्याच्या तक्रारी रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांकडून वेळोवेळी प्राप्त होत असल्याचा आरोपही पेंदोरकर यांनी केला. डॉक्टरांची नियमित उपस्थिती सुनिश्चित करून रुग्णांना वेळेत वैद्यकीय सल्ला व उपचार मिळतील, यासाठी प्रशासनाने प्रभावी उपाययोजना करावी, अशी मागणी त्यांनी केली.
गडचिरोलीसारख्या दुर्गम व आदिवासीबहुल जिल्ह्यात नागरिकांना दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याची मोठी जबाबदारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयावर आहे. त्यामुळे पायाभूत सुविधा आणि वैद्यकीय यंत्रणा सुरळीत करण्यासोबतच रुग्णसेवा, वैद्यकीय सेवा आणि वैद्यकीय शिक्षणाचा दर्जा उंचावण्याची आवश्यकता असल्याचे पेंदोरकर यांनी नमूद केले.
गडचिरोलीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यामागील उद्देश तेव्हाच सफल होईल, जेव्हा सर्वसामान्य व गोरगरीब नागरिकांना उत्तम दर्जाची आरोग्यसेवा स्थानिक पातळीवर उपलब्ध होईल. त्यामुळे रुग्णालयातील सर्व समस्या गांभीर्याने घेऊन त्या तातडीने सोडवाव्यात, अशी मागणी कुणाल पेंदोरकर यांनी केली.
नवनियुक्त अधिष्ठाता डॉ. राजेंद्र सुरपाम यांनी रुग्णालयातील समस्या आणि विविध विषयांवर झालेल्या चर्चेची दखल घेतली. गडचिरोलीतील आरोग्यव्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी प्रशासनाच्या पातळीवर आवश्यक प्रयत्न करण्याची अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.या भेटीदरम्यान युवक काँग्रेसचे तौफिक शेख आणि कमलेश खोब्रागडे उपस्थित होते.




Petrol Price




