निवृत्तीवेतन धारकांनी घरबसल्या सादर करावे डिजिटल जीवन प्रमाणपत्र


- १ ते ३० नोव्हेंबर दरम्यान पाचवी राष्ट्रव्यापी डिजिटल जीवन प्रमाणपत्र मोहीम
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : राज्य शासनाच्या निवृत्तीवेतन धारकांना निवृत्तीवेतन नियमितपणे मिळत राहावे, यासाठी दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात हयातीचा दाखला (जीवन प्रमाणपत्र) सादर करणे आवश्यक असते. ही प्रक्रिया अधिक सुलभ करण्यासाठी केंद्र शासनाच्या निवृत्तीवेतन आणि निवृत्तीवेतनधारक कल्याण विभागामार्फत १ ते ३० नोव्हेंबर २०२६ या कालावधीत पाचवी राष्ट्रव्यापी डिजिटल जीवन प्रमाणपत्र मोहीम राबविण्यात येत आहे.
या मोहिमेंतर्गत जिल्ह्यातील सर्व निवृत्तीवेतन धारक व कुटुंब निवृत्तीवेतनधारकांनी जीवन प्रमाण प्रणालीद्वारे घरबसल्या डिजिटल जीवन प्रमाणपत्र सादर करावे, असे आवाहन प्रभारी जिल्हा कोषागार अधिकारी संजय पडिशालवार आणि अपर कोषागार अधिकारी (निवृत्तीवेतन) स्वाती कुलकर्णी यांनी केले आहे.
निवृत्तीवेतनधारकांना दरवर्षी हयातीचा दाखला सादर करण्यासाठी बँक किंवा कोषागार कार्यालयात प्रत्यक्ष जावे लागत होते. विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाने विकसित केलेल्या ‘जीवन प्रमाण’ या डिजिटल प्रणालीमुळे निवृत्तीवेतनधारकांना घरबसल्या जीवन प्रमाणपत्र सादर करण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे.
या प्रणालीद्वारे आधार आधारित बायोमेट्रिक प्रमाणीकरण किंवा चेहरा प्रमाणीकरण (फेस ऑथेंटिकेशन) तंत्रज्ञानाच्या साहाय्याने मोबाईलवरून डिजिटल जीवन प्रमाणपत्र तयार करून सादर करता येते. या सुविधेमुळे विशेषतः वृद्ध, दिव्यांग तसेच प्रवास करण्यास अडचण असलेल्या निवृत्तीवेतनधारकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
डिजिटल जीवन प्रमाणपत्र तयार करण्याची प्रक्रिया व त्यासाठी आवश्यक माहिती सर्व बँकांच्या शाखा अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे. निवृत्तीवेतन धारकांनी या सुविधेचा लाभ घेऊन नोव्हेंबर महिन्यात आपले जीवन प्रमाणपत्र सादर करावे, जेणेकरून निवृत्तीवेतनाचे नियमित प्रदान सुरू राहील, असे प्रभारी जिल्हा कोषागार अधिकारी संजय पडिशालवार यांनी कळविले आहे.




Petrol Price




