आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा १५ जुलैपासून सुरु होणार : वेळापत्रक जाहीर


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / मुंबई :
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. उन्हाळी सत्राच्या लेखी आणि प्रात्यक्षिक परीक्षा १५ जुलैपासून सुरु होणार आहे.
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने आपल्या अधिकृत संकेतस्थळावर वेळापत्रक जाहीर केले आहे. ज्या महाविद्यालयात प्रवेश आहे तेथेच या परीक्षा होणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारची समस्या निर्माण होऊ नये यासाठी विद्यापीठाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी यंदा विद्यार्थी शिकत असलेल्या महाविद्यालयात त्यांची प्रात्यक्षिक आणि लेखी परीक्षा होणार आहे.  विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी विद्यार्थ्यांना त्यांच्या गावाजवळील अभ्यासक्रमाच्या परीक्षा केंद्रांवरही परीक्षा देण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. विद्याशाखा आणि जिल्हानिहाय परीक्षा केंद्रांची यादी ८ ते १० दिवसांमध्ये विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करुन दिली जाईल. कोरोनाच्या संसर्गामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या सोयीनुसार परीक्षा केंद्र बदलता येणार आहे. गावातच अथवा शिकत असलेल्या महाविद्यालयात परीक्षा देता येणार आहे.
राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी दोन दिवसांपूर्वी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची राजभवनात भेट घेतली होती. उन्हाळी सत्राच्या परीक्षा १५ जुलैनंतर घेण्याचा आराखडा अमित देशमुख यांनी राज्यपालासमोर सादर केला होता. या आराखड्याला राज्यपालांनी मंजुरीही दिली होती.
  Print


News - Rajy | Posted : 2020-06-06


Related Photos