महत्वाच्या बातम्या

 क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा यांना मरणोत्तर भारतरत्न द्या!


- जनजातीय गौरव दिनानिमित्त केंद्र व महाराष्ट्र सरकारकडे विनोद मडावी यांची जोरदार मागणी : आदिवासी समाजाच्या ऐतिहासिक योगदानाचा राष्ट्रीय स्तरावर सन्मान करण्याचे आवाहन

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : महान आदिवासी क्रांतिकारक, स्वातंत्र्यसेनानी आणि जननायक क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त १५ नोव्हेंबर रोजी देशभरात जनजातीय गौरव दिन साजरा करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर आझाद समाज पार्टीचे गडचिरोली जिल्हा प्रभारी विनोद मडावी यांनी भगवान बिरसा मुंडा यांना मरणोत्तर देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान असलेला भारतरत्न पुरस्कार प्रदान करण्यात यावा, अशी जोरदार मागणी केंद्र व महाराष्ट्र सरकारकडे केली आहे. आदिवासी समाजाच्या ऐतिहासिक संघर्षाचा, बलिदानाचा आणि देशाच्या स्वातंत्र्यलढ्यातील योगदानाचा सन्मान करण्यासाठी सरकारने यासंदर्भात ठोस निर्णय घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले आहे

.भगवान बिरसा मुंडा यांनी अवघ्या २५ वर्षांच्या अल्प आयुष्यात ब्रिटिश राजवटीच्या अन्यायकारक धोरणांविरुद्ध आणि आदिवासी समाजावरील शोषणाविरुद्ध ऐतिहासिक उलगुलान क्रांती उभी केली. जल, जंगल आणि जमिनीवरील आदिवासींचे पारंपरिक अधिकार अबाधित राहावेत, त्यांच्या संस्कृतीचे, अस्मितेचे आणि सामाजिक अस्तित्वाचे संरक्षण व्हावे, यासाठी त्यांनी ब्रिटिश सत्तेविरुद्ध प्रखर संघर्ष केला. त्यांचे संपूर्ण जीवन आदिवासी समाजाच्या स्वाभिमानासाठी, हक्कांसाठी आणि स्वातंत्र्यासाठी समर्पित होते. त्यामुळे भगवान बिरसा मुंडा यांचे योगदान केवळ आदिवासी समाजापुरते मर्यादित नसून संपूर्ण देशाच्या स्वातंत्र्यलढ्याच्या आणि सामाजिक न्यायाच्या इतिहासातील एक महत्त्वपूर्ण पर्व असल्याचे विनोद मडावी यांनी नमूद केले.

केवळ जयंती उत्सव नको, महापुरुषांच्या कार्याला राष्ट्रीय सन्मान मिळावा! -
यासंदर्भात आपली भूमिका स्पष्ट करताना विनोद मडावी म्हणाले की, आज देशभरात जनजातीय गौरव दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. आदिवासी महापुरुषांच्या नावाने कोट्यवधी रुपये खर्च करून विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी भाषणे केली जात आहेत. मात्र, आदिवासी समाजाला केवळ जयंती उत्सव, भाषणे आणि सरकारी घोषणांमधून सन्मान नको आहे, तर त्यांच्या महापुरुषांनी देशासाठी दिलेल्या ऐतिहासिक बलिदानाला देशाच्या सर्वोच्च नागरी पुरस्कारातही योग्य स्थान मिळाले पाहिजे.

ते पुढे म्हणाले की, केंद्र आणि महाराष्ट्र सरकारला खऱ्या अर्थाने आदिवासी समाजाचा गौरव करायचा असेल, तर क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा यांना मरणोत्तर ‘भारतरत्न’ पुरस्कार प्रदान करण्याची ऐतिहासिक घोषणा करण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. आदिवासी महापुरुषांचा सन्मान केवळ प्रतीकात्मक स्वरूपात न राहता तो राष्ट्रीय पातळीवर ठोस कृतीतून दिसून यावा. भगवान बिरसा मुंडा यांचे कार्य आणि त्यांचे बलिदान देशाच्या सर्वोच्च सन्मानास पात्र असल्याचेही त्यांनी ठामपणे सांगितले.

सरकारी कार्यक्रमाच्या आयोजनावरही टीका -
दरम्यान, जनजातीय गौरव दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमांच्या जाहिराती आणि त्यावर होणारा खर्च पाहता हा सरकारी कार्यक्रम आहे की भाजपाची प्रचारसभा, असा सवाल उपस्थित करत विनोद मडावी यांनी टीका केली. सरकारी कार्यक्रमांना राजकीय स्वरूप देण्याची प्रथा लोकशाहीसाठी आणि देशाच्या सामाजिक ऐक्यासाठी घातक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. आदिवासी महापुरुषांच्या जयंतीचे कार्यक्रम हे त्यांच्या विचारांचा प्रसार, संघर्षाची जाणीव आणि समाजाच्या मूलभूत प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी असावेत, केवळ राजकीय प्रसिद्धीसाठी नव्हेत, अशी भूमिका त्यांनी मांडली.

गडचिरोलीतील ऐतिहासिक व्यासपीठावरून भारतरत्नची घोषणा करण्याची मागणी -
गडचिरोली हा आदिवासीबहुल जिल्हा असून भगवान बिरसा मुंडा यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त येथे पंतप्रधान, राज्यपाल, मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्र्यांच्या उपस्थितीत ऐतिहासिक सोहळ्याचे आयोजन करण्यात येत आहे. त्यामुळे या महत्त्वपूर्ण प्रसंगी केंद्र सरकारने भगवान बिरसा मुंडा यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार प्रदान करण्याबाबत सकारात्मक भूमिका घ्यावी आणि याच ऐतिहासिक व्यासपीठावरून यासंदर्भातील घोषणा करावी, अशी मागणी आझाद समाज पार्टीच्या वतीने करण्यात आली आहे.

आदिवासी समाजाच्या संघर्षाचा आणि स्वाभिमानाचा सन्मान ठरेल! -
भगवान बिरसा मुंडा यांना मरणोत्तर भारतरत्न प्रदान करणे म्हणजे केवळ एका महान क्रांतिकारकाचा गौरव करणे नव्हे, तर देशातील कोट्यवधी आदिवासी बांधवांच्या संघर्षाचा, बलिदानाचा, स्वाभिमानाचा आणि ऐतिहासिक योगदानाचा राष्ट्रीय स्तरावर सन्मान करणे होय. त्यामुळे केंद्र व राज्य सरकारने या मागणीची गांभीर्याने दखल घेऊन भगवान बिरसा मुंडा यांना देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान देण्यासाठी आवश्यक पुढाकार घ्यावा, अशी ठाम मागणी आझाद समाज पार्टीचे जिल्हा प्रभारी विनोद मडावी यांनी केली आहे.






  Print






Related Photos