उधारीचे रक्कम मागितल्याने युवकावर लोखंडी रॉडने हल्ला


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : तीन वर्षांपूर्वी उधार दिलेले ५५ हजार रुपये परत मागितल्याने झालेल्या वादातून एका युवकावर लोखंडी रॉडने हल्ला करण्यात आल्याची घटना १३ नोव्हेंबर रोजी रात्री ११.३० वाजताच्या सुमारास फवारा चौक ब्रम्हपुरी परिसरात घडली. या हल्ल्यात युवकाच्या डोक्याला आणि हाताला दुखापत झाली असून त्याच्यावर ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले. पेठ वार्ड ब्रम्हपुरी येथील चेतन गणपत मेश्राम २९ यांनी साईनगर येथील यश भाऊराव नवलाखे ३६ याला सुमारे तीन वर्षांपूर्वी ५५ हजार रुपये उधार दिले होते. काही दिवसांत पैसे परत करण्याचे आश्वासन देऊनही यश नवलाखे याने वारंवार मागणी करूनसुद्धा रक्कम परत केली नव्हती.
१३ नोव्हेंबर रोजी चेतन यांनी दूरध्वनी करून उधार दिलेले पैसे परत मागितले. यावर आरोपीने त्यांना फवारा चौकात बोलावले. तेथे पैशांच्या कारणावरून दोघांमध्ये वाद झाला. या वादातून आरोपीने शिवीगाळ करीत चेतन यांच्या दुचाकीवरून लोखंडी रॉड काढला आणि त्यांच्या डोक्यावर व हातावर वार करून जखमी केले.
घटनेनंतर स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमी चेतन यांना ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी चेतन यांच्या तक्रारीवरून चंद्रपूर शहर पोलिसांनी यश नवलाखे याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ११८ (१) आणि ३५२ अन्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास ब्रम्हपुरी पोलीस ठाण्याचे ठाणेदार कांचन पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.




Petrol Price




