गडचिरोली जिल्ह्यात चंडिपुराच्या सहा रुग्णांची नोंद, राष्ट्रीय विषाणू संस्थेची (एनआयव्ही) चमू येणार गडचिरोलीत


- आरोग्य विभागाने घेतली गंभीर दखल 
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : 
डेंग्यू, स्क्रब टायफसच्या प्रकोपासोबतच आता चंडिपुरा  (मेंदूज्वर)  चे ही रुग्ण आढळून आल्यामुळे आरोग्य विभागाने गंभीर दखल घेतली आहे.  २००८ ते २०१२  दरम्यान  या आजाराने  ३७ बळी घेतले होते. सहा वर्षानंतर  पुन्हा या आजाराने डोके वर काढले आहे. गडचिरोली जिल्ह्यात चंडिपुराच्या सहा रुग्णांची नोंद  करण्यात आली आहे. मेंदूज्वराच्या विषाणूंच्या तपासणीसाठी पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू संस्थेची (एनआयव्ही) चमू गडचिरोलीत येणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
चंडीपुरा तापाचे रुग्ण सर्वप्रथम भंडारा जिल्ह्यातील चंडीपुरा येथे १९६५ साली आढळले होते. त्यावरून या तापाला चंडीपुरा असे नाव देण्यात आले. ‘सँडफ्लाय’ पासून चंडीपुराची लागण व प्रसार होतो. मुख्यत: गाई, म्हशी व अन्य गुरेढोरांवर या ‘सँडफ्लाय’ आढळतात.  २०१३ ते २०१७ पर्यंत नागपूर विभागातील सहा जिल्ह्यात कुठेच या आजाराच्या रुग्णांची नोंद झाली नाही. परंतु या वर्षी गडचिरोली जिल्ह्यात सहा रुग्ण ‘पॉझिटिव्ह’ येताच खळबळ उडाली.
 ‘सँडफ्लाय’ गुरांना चावल्यानंतर चंडीपुराचे विषाणू त्यांच्या शरीरात शिरतात. त्यानंतर ते रात्री एखाद्या व्यक्तीला चावल्यास हे विषाणू त्या व्यक्तीच्या शरीरात प्रवेश घेतात. अशा प्रकारे चंडीपुराचा प्रसार होतो. या आजारात व्हायरल तापासारखा ताप येतो व चंडीपुराची लागण झाल्यास पोट दुखणे, जुलाब, उलट्या होतात. ताप मोठ्या प्रमाणात वाढून तो मेंदूत गेल्यास रुग्णाचा मृत्यू होतो. चंडीपुरावर नेमका औषधोपचार नाही. लक्षणे बघून उपचार केला जातो.    Print


News - Gadchiroli | Posted : 2018-09-29


Related Photos