महत्वाच्या बातम्या

 दिवाळीपूर्वी ब्रह्मपुरी पोलिसांची भेट : ४२ हरविलेले मोबाईल मूळ मालकांना परत


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : हरविलेला मोबाईल पुन्हा मिळण्याची आशा सोडलेल्या नागरिकांना ब्रह्मपुरी पोलिसांनी दिवाळीपूर्वी अनोखी भेट दिली आहे. तांत्रिक तपासाच्या माध्यमातून शोध घेऊन तब्बल ४२ हरविलेले मोबाईल शोधण्यात ब्रह्मपुरी पोलिसांना यश आले. दिवाळीच्या पूर्वसंध्येला पोलीस निरीक्षक कांचन पांडे यांच्या हस्ते हे मोबाईल त्यांच्या मूळ मालकांना परत करण्यात आले. ब्रह्मपुरी पोलीस ठाण्यात मोबाईल हरविल्याबाबत प्राप्त झालेल्या तक्रारींच्या अनुषंगाने पोलिसांनी केंद्र सरकारच्या सीईआयआर (CEIR) पोर्टलच्या माध्यमातून शोधमोहीम राबविली. या पोर्टलच्या मदतीने ब्रह्मपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीसह आजूबाजूच्या परिसरात हरविलेल्या मोबाईलचा शोध घेण्यात आला. या मोहिमेत एकूण ४२ मोबाईल मिळविण्यात पोलिसांना यश आले.

हरविलेले मोबाईल पुन्हा हातात मिळाल्याने नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला. अनेक दिवसांपासून मोबाईल मिळण्याची प्रतीक्षा करणाऱ्या नागरिकांनी ब्रह्मपुरी पोलिसांचे आभार मानत समाधान व्यक्त केले.

ही कामगिरी पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, ब्रह्मपुरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी साहील झरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक कांचन पांडे यांचा नेतृत्वात गुन्हे शोध पथकातील सहायक पोलीस निरीक्षक मनोज खडसे, पोलीस हवालदार मुकेश गजबे, मिलिंद नैताम तसेच पोलीस अंमलदार प्रवीण भिवगडे, निलेश तुमसरे, इर्शाद खान, स्वप्नील पळसपगार आणि वशिष्ट रंगारी यांनी केले.





  Print






Related Photos