महत्वाच्या बातम्या

 गडचिरोली जिल्हाधिकारी कार्यालयावर शिवसेनेचा जनआक्रोश : विविध मागण्यांसाठी धडकला भव्य मोर्चा


- वनहक्क पट्टे, कर्जमाफी आणि धान बोनससाठी शेतकरी आदिवासींचा एल्गार


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : शेतकरी, शेतमजूर, आदिवासी बांधव, विद्यार्थी आणि सर्वसामान्य जनतेच्या विविध न्याय्य हक्कांसाठी आणि प्रलंबित प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने मंगळवार, ३ नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. पक्षाचे गडचिरोली जिल्हाप्रमुख पवन राघोजी गेडाम यांच्या नेतृत्वात निघालेल्या या मोर्च्यात शेकडो नागरिक उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. सकाळी ११ वाजता शिवसेना पक्ष कार्यालयातून या मोर्चाला सुरुवात झाली. हातात पक्षाचे झेंडे आणि मागण्यांचे फलक घेऊन कार्यकर्त्यांसह नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. शासनाच्या ढिसाळ धोरणांविरोधात आणि स्थानिक प्रश्नांकडे होत असलेल्या दुर्लक्षाविरोधात या वेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

या मोर्च्यामध्ये वन अतिक्रमणधारकांचे पुरावे २००५ च्या अगोदरचे असो किंवा नंतरचे, सर्व पात्र वनहक्कधारकांना सरसकट वनहक्क पट्टे देण्यात यावेत, संपूर्ण गडचिरोली जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करून शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज सरसकट माफ करण्यात यावे, आणि धान उत्पादक शेतकऱ्यांना शासकीय हमीभावाव्यतिरिक्त अतिरिक्त बोनस जाहीर करण्यात यावा, अशा प्रमुख मागण्या लावून धरण्यात आल्या. याशिवाय वीज ग्राहकांवरील स्मार्ट मीटर रद्द करावेत, धानोरा-मुरुमगाव राष्ट्रीय महामार्ग ९३० चे पक्के बांधकाम तातडीने पूर्ण करावे, शासकीय रुग्णालयांतील रिक्त पदे तत्काळ भरावीत, तसेच शासकीय व आश्रमशाळा वसतिगृहातील निवासी विद्यार्थ्यांना दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात, या मागण्यांवरही जोर देण्यात आला.

या जनआक्रोश मोर्च्याचे नेतृत्व जिल्हाप्रमुख पवन गेडाम यांनी केले. या वेळी सहसंपर्क प्रमुख श्रीकांत बंसोड, विधानसभा संघटक नंदूभाऊ कुमरे, माजी जिल्हा संघटक विलास ठोंबरे, युवासेना जिल्हाप्रमुख गुणाजी बोरकुटे, शहर प्रमुख पप्पू शेख, तालुका प्रमुख घनश्याम कोलते, गोविंदा बाबनवाडे, संतोष लोनबले, शेडमाके, मनोज पोरटे, विलास ठाकरे, सदाशिव गहाणे, आशिष काळे, उपतालुका प्रमुख होमराज गायकवाड, शहर प्रमुख विश्वास सहारे, युवा नेते अमोल कुळमेथे, तुषार मडावी, माजी जि. प. सदस्य वेणू ढवगाये, चेतन उरकुडे, वैभव सातपुते, अतुल नैताम, भूषण पोरटे, देविदास काळबांधे, लहानू पिल्लारे, दिगांबर मेश्राम यांच्यासह महिला आघाडी, युवासेना, शेतकरी व शेतमजूर मोठ्या संख्येने उपस्थित होते. मोर्च्याच्या शेवटी शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन सादर करून तातडीने सकारात्मक निर्णय न घेतल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला.





  Print






Related Photos