महत्वाच्या बातम्या

 सरदार पटेल महाविद्यालयात विकसित भारत युवा संवाद व जिल्हास्तरीय युवा संसद स्पर्धा उत्साहात


विदर्भ न्यूज एक्सप्रेस  
प्रतिनिधी / चंद्रपूर : युवकांमधील नेतृत्वगुण, वैचारिक क्षमता आणि लोकशाही मूल्यांची जाणीव वृद्धिंगत करण्याच्या उद्देशाने मेरा युवा भारत, चंद्रपूर, युवा कार्यक्रम एवं खेल मंत्रालय, भारत सरकार आणि सर्वोदय शिक्षण मंडळ संचालित सरदार पटेल महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विकसित भारत युवा संवाद व जिल्हास्तरीय विकसित भारत युवा संसद हा कार्यक्रम २ नोव्हेंबर रोजी महाविद्यालयात उत्साहात पार पडला. या स्पर्धेत जिल्ह्यातील तब्बल १४५ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून आपल्या विचारांचे प्रभावी सादरीकरण केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रमोद एम. काटकर होते. प्रमुख अतिथी म्हणून मेरा युवा भारत, चंद्रपूरचे जिल्हा युवा अधिकारी सारंग मेश्राम, नागपूरचे युथ आयकॉन अमन भंडारकर, स्पर्धेचे परीक्षक तथा गोंडवाना विद्यापीठाचे राष्ट्रीय सेवा योजना संचालक प्रा. डॉ. श्याम खंडारे, राजेंद्रसिंग गौतम, डॉ. सरोजकुमार दत्ता, राष्ट्रीय सेवा योजनेचे जिल्हा समन्वयक प्रा. डॉ. गुरुदास बल्की, विभागीय समन्वयक प्रा. डॉ. कुलदीप आर. गोंड, मेरा युवा भारतचे अधिकारी संजय राऊत, रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. वंदना खनके आणि प्रा. विक्की पेटकर यांची उपस्थिती होती.

यावेळी मार्गदर्शन करताना प्राचार्य डॉ. प्रमोद एम. काटकर यांनी युवकांनी देशाच्या विकास प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेऊन लोकशाही मूल्यांचे जतन करावे आणि राष्ट्रनिर्मितीमध्ये महत्त्वपूर्ण योगदान द्यावे, असे आवाहन केले. सारंग मेश्राम यांनी केंद्र शासनाच्या युवकांसाठी असलेल्या विविध उपक्रमांची माहिती देत विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी युवकांची भूमिका निर्णायक असल्याचे सांगितले. तर अमन भंडारकर यांनी पॉवरपॉइंट सादरीकरणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना आत्मविश्वास, नेतृत्वगुण, संवादकौशल्य आणि सामाजिक जाणीव विकसित करण्याचे महत्त्व विशद केले.

जिल्हास्तरीय युवा संसद स्पर्धेत विद्यार्थ्यांनी लोकशाही, राष्ट्रविकास आणि विकसित भारताच्या निर्मितीमध्ये युवकांची भूमिका या विषयांवर आपले विचार प्रभावीपणे मांडले. स्पर्धेच्या निकालात बिक्रम हलदार याने प्रथम क्रमांक पटकाविला. इमास हुसैन याने द्वितीय, तर वेदांत विधाते याने तृतीय क्रमांक मिळविला. विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

कार्यक्रमाचे संचालन रोशन चौधरी यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. डॉ. कुलदीप आर. गोंड यांनी केले. प्राचार्य डॉ. प्रमोद एम. काटकर यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी महाविद्यालयातील प्राध्यापकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी, प्रा. हनमंतू डंबारे, राजेश इंगोले, रोशन चौधरी, गौरव झाडे, साक्षी बिल्लरवार आणि राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी विशेष परिश्रम घेतले.

या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये लोकशाही मूल्ये, नेतृत्वक्षमता, वैचारिक अभिव्यक्ती आणि राष्ट्रनिर्मितीविषयीची जाणीव अधिक दृढ झाली. दरम्यान, सर्वोदय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अरविंद पोरेड्डीवार, कार्याध्यक्ष आमदार किशोर जोरगेवार, उपाध्यक्ष सुदर्शन निमकर व सगुणा तलांडी, सचिव प्रशांत पोटदुखे, कोषाध्यक्ष संदीप गड्डमवार तसेच कार्यकारी सदस्य राकेश पटेल, शेख रमजान, सुरेश पोटदुखे आणि जीनेश पटेल यांनी या उपक्रमाच्या यशस्वितेबद्दल आयोजक व सहभागी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.





  Print






Related Photos