लोहप्रकल्प उभारण्याच्या नावावर सुरू असलेले सुरजागड पहाडीवरील उत्खनन बंद करा, अन्यथा अहेरी उपविभागात चक्काजाम आंदोलन करणार


- जिल्हा परिषद उपाध्यक्ष  अजय कंकडालवार यांचा  इशारा
- जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
  जिल्हा हा वने आणि खनीज संपत्तीने नटलेला आहे. यामुळे अनेक  वर्षांपासून येथील आदिवासी जनता वनोपजाच्या माध्यमातून आपला उदरनिर्वाह  करीत आहे. खनीजसंपत्तीवर आधारित उद्योग जिल्ह्यात उभारण्यात यावा आणि  स्थानिक बेरोजगारांना रोजगार उपलब्ध व्हावा, अशीही येथील जनतेची मागणी आहे. मात्र  लोहप्रकल्प न उभारताच अब्जावधी रूपयांची खनीज संपत्ती अन्य जिल्ह्यात  हलविली जात आहे. यामुळे केवळ एका खासगी कंपनीचाच फायदा होत असून  जिल्ह्याला कोणताही फायदा नाही. जिल्ह्यात लोहप्रकल्प उभारणीचे केवळ  भूमिपुजन करण्यात आले आणि खनीजे हलविण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.  यामुळे हे उत्खनन त्वरीत बंद करण्यात यावे आणि लोहप्रकल्प जोपर्यंत सुरू होत  नाही तोपर्यंत उत्खनन करण्यास परवानगी देवू नये, अन्यथा आदिवासी विद्यार्थी संघाच्या वतीने अहेरी उपविभागातील पाचही तालुक्यात चक्काजाम आंदोलन करून आक्रमक भूमिका घेऊ असा इशारा जिल्हा परिषद उपाध्यक्ष अजय कंकडालवार यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, जिल्ह्यात चामोर्शी तालुक्यातील कोनसरी येथे लाॅयड मेटल कंपनीला  लोहप्रकल्प उभारणीस परवानगी देण्यात आली. या प्रकल्पासाठी केवळ जमिनीचे  संपादन करण्यात आले. मात्र अद्याप कोणत्याही प्रकारचे काम सुरू करण्यात आले  नाही. असे असतानाही अब्जावधी रूपयांची खनीजे चंद्रपूर जिल्ह्यातील याच  कंपनीच्या कारखान्यात वाहून नेली जात आहे. लोहप्रकल्प अहेरी उपविभागातच  उभारावा अशी येथील जनतेची मागणी होती. मात्र या मागणीला बगल देवून प्रकल्प  इतरत्र हलविण्यात आला. पण प्रकल्पाचे काम सुरू करण्यात आले नाही. सुरजागड पहाडीवर मोठ्या प्रमाणात उत्खनन करण्यात आले आहे. या ठिकाणाहून निघालेली खनीजे हलविण्यात आली. यामुळे वनसंपदेचेसुध्दा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, पर्यावरणाचा  ऱ्हास  होत आहे. मोठमोठी अवजड वाहने  जावून परिसरातील रस्त्यांची अवस्था बिकट झाली आहे. एवढेच नाही तर वाहनांच्या आवागमनामुळे सामान्य जनता त्रस्त झाली आहे. लोहखनीजे वाहून नेणाऱ्या वाहनांमुळे झालेल्या अपघातात अनेकांनी आपले प्राणसुध्दा गमावले आहे. तरीही  शासन गंभीर नसून अजूनही उत्खनन सुरूच ठेवले आहे. प्रकल्प उभारण्याआधीच  लोहखनीजे वाहून नेवून आपले हित साध्य करीत आहे. 
खनीज संपत्तीवर आधारित उद्योग निर्मितीमुळे रोजगार मिळेल अशी जिल्ह्यातील बेरोजगारांना आशा आहे. मात्र प्रकल्प उभारणीस विलंब करून केवळ  खनीजे वाहून नेल्या जात असल्याने जिल्ह्यातील जनतेने काय करावे, असा प्रश्न  उपस्थित झाला आहे. यामुळे सुरजागड येथे सुरू असलेले उत्खनन त्वरीत बंद  करण्यात यावे, उत्खननाचे परवाने रद्द करण्यात यावे, अन्यथा जनतेला रस्त्यावर  उतरल्याशिवाय पर्याय उरणार नाही. जिल्ह्याच्या, बेरोजगारांच्या , आदिवासी  जनतेच्या जिव्हाळ्याचा असलेल्या या प्रश्नाकडे गांभिर्याने लक्ष द्यावे अन्यथा  आदिवासी विद्यार्थी संघाच्या वतीने रस्त्यावर उतरून तिव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.  Print


News - Gadchiroli | Posted : 2018-09-25


Related Photos