चंद्रपूर जिल्हा न्यायालयाला बॉम्बने उडविण्याची धमकी : ई-मेलने खळबळ


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : न्यायदानाच्या पवित्र वास्तूत सोमवारी दुपारी अचानक भीतीचे सावट पसरले. अज्ञात व्यक्तीने ई-मेलद्वारे चंद्रपूर जिल्हा न्यायालयाची इमारत बॉम्बने उडविण्याची धमकी दिल्याने संपूर्ण न्यायालय परिसरात एकच खळबळ उडाली. काही क्षणांतच शांत असलेल्या न्यायालयात घबराट आणि धावपळ सुरू झाली. न्यायाधीश, वकील, पक्षकार आणि न्यायालयीन कर्मचाऱ्यांना जीवाच्या सुरक्षिततेसाठी तातडीने इमारतीबाहेर काढण्यात आले.
आज सोमवारी दुपारी ३ वाजून ११ मिनिटांनी अज्ञात व्यक्तीकडून धमकीचा ई-मेल प्राप्त झाला. न्यायालय प्रशासनाने तत्काळ पोलिस नियंत्रण कक्ष आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना याची माहिती दिली. माहिती मिळताच चंद्रपूर पोलिसांची विविध पथके घटनास्थळी दाखल झाली. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन संपूर्ण न्यायालय इमारत रिकामी करण्यात आली.
यानंतर बॉम्बशोधक व नाशक पथक आणि श्वान पथकाने न्यायालयातील प्रत्येक कक्ष, खोल्या, अंतर्गत भाग तसेच संपूर्ण परिसराची बारकाईने तपासणी सुरू केली. न्यायालयाच्या प्रत्येक कोपऱ्याची झाडाझडती घेण्यात आली. या काळात न्यायालय परिसरात मोठी गर्दी आणि चिंतेचे वातावरण होते. वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि सुरक्षा यंत्रणांचे कर्मचारीही घटनास्थळी तैनात होते.
सुमारे दोन तास चाललेल्या या तपासणीत कोणतीही संशयास्पद वस्तू किंवा स्फोटक सामग्री आढळून आली नाही. त्यामुळे सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला. तपासणी पूर्ण झाल्यानंतर न्यायाधीश, वकील, पक्षकार आणि कर्मचाऱ्यांना पुन्हा न्यायालयात प्रवेश देण्यात आला.
दरम्यान, न्यायदानाच्या मंदिरालाच बॉम्बने उडविण्याची धमकी मिळाल्याने चंद्रपूरमध्ये या घटनेची जोरदार चर्चा सुरू झाली. ही धमकी नेमकी कोणी आणि कोणत्या उद्देशाने दिली, याबाबत प्रश्न उपस्थित होत असून, परिसरात झालेली ही कारवाई मॉकड्रिल होती का, अशीही चर्चा नागरिकांमध्ये सुरू होती.




Petrol Price




