शनिवारी जिल्हास्तरीय गुंतवणुक परिषदेचे आयोजन उद्योग मंत्र्यांसह पालकमंत्री उपस्थित राहणार


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / वर्धा : जिल्ह्यात उद्योग क्षेत्रामध्ये गुंतवणूक आकर्षित करण्यासोबतच गुंतवणूकदार व व्यवसायिकांना एकत्रित व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी २९ ऑगस्ट रोजी उद्योग मंत्री उदय सामंत, पालकमंत्री डॉ. पंकज भोयर, लोकप्रतिनिधी तसेच जिल्हाधिकारी वान्मथी सी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेला जिल्ह्यातील सर्व ओद्योगिक संघटना, नामांकित उद्योजक, औद्योगिक समूह, सनदी लेखापाल तसेच उद्योग व व्यवसायाशी संबंधित विविध शासकीय विभागांचे प्रतिनिधींनी उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
२९ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता आशिर्वाद सेलिब्रेशन, साटोडा चौक, नागपूर तुळजापूर हायवे, वर्धा येथे आयोजित गुंतवणुक परिषदेचा उद्देश जिल्हास्तरावर गुंतवणूक आकर्षित करणे, जिल्ह्यातील गुंतवणूकदार व व्यवसायांना एकत्रित व्यासपीठ उपलब्ध करून देणे तसेच जिल्ह्यांना विकासाचे केंद्रबिंदू मानून जिल्ह्याच्या व राज्याच्या विकासाला चालना देणे हा आहे. या परिषदेमध्ये जिल्ह्यातील प्रमुख उद्योग क्षेत्रांबाबत चर्चासत्र, गुंतवणुकीच्या संधी, क्षमता असलेल्या विविध क्षेत्रांमधील गुंतवणूक व व्यवसायाच्या संधी याबाबत चर्चा करण्यात येणार आहे. तसेच सामंजस्य करारांवर स्वाक्षरी करण्याचा कार्यक्रम, उद्योजकांचे अनुभव कथन आदी उपक्रमांचा समावेश राहणार आहे.
परिषदेच्या अनुषंगाने प्रातिनिधिक स्वरूपात जिल्ह्यातील उत्पादनांचे प्रदर्शनही आयोजित करण्यात येणार आहे. यामध्ये निर्यातक्षम उत्पादने, भौगोलिक मानांकन प्राप्त उत्पादने, एक जिल्हा एक उत्पादन अंतर्गत उत्पादने तसेच विविध शासकीय योजनांच्या लाभार्थ्यांनी उत्पादित केलेल्या वस्तूंचा समावेश राहणार आहे.
जिल्ह्यातील सर्व ओद्योगिक संघटना, नामांकित उद्योजक, औद्योगिक समूह, सनदी लेखापाल तसेच उद्योग व व्यवसायाशी संबंधित विविध शासकीय विभागांचे प्रतिनिधी या परिषदेत सहभागी होणार आहेत. जिल्ह्यातील होतकरू व इच्छुक उद्योजक, औद्योगिक संघटना, ओद्योगिक समूहातील उद्योग घटक तसेच उद्योग-व्यवसायाशी संबंधित संस्थांनी जिल्ह्यात उद्योग क्षेत्रात गुंतवणूक करताना येणाऱ्या अडचणी, उपलब्ध संधी व संभाव्य गुंतवणूक याबाबत माहिती व चर्चेसाठी जिल्हा उद्योग केंद्र, वर्धा येथे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे सहायक आयुक्त सुनिल हजारे यांनी केले आहे.




Petrol Price




