इलेक्ट्रिक मोपेडचे आमिष दाखवून नागभिड मध्ये लाखोंची फसवणूक


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : स्वस्त दरात इलेक्ट्रिक मोपेड देण्याचे आमिष दाखवून बुकिंग व डाऊन पेमेंटच्या नावाखाली ग्राहकांकडून पैसे उकळल्यानंतर वाहनांची डिलिव्हरी न देता आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार नागभीड येथे उघडकीस आला आहे. या प्रकरणी नागभीड पोलिसांनी तिघांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१६(२), ३१८(४) आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. तक्रारदारासह इतर ग्राहकांची एकूण २ लाख ६६ हजार ९१८ रुपयांची फसवणूक झाल्याचे पोलिसांच्या चौकशीत निष्पन्न झाले आहे.
मौशी येथील शेतकरी सुरेश गजानन राऊत (वय ५०) यांनी यासंदर्भात पोलिसांत तक्रार दिली. तक्रारीनुसार, १२ जुलै २०२४ ते १२ मार्च २०२५ या कालावधीत आरोपींनी संगनमत करून नागभीड येथे इलेक्ट्रिक स्कुटी विक्रीच्या नावाखाली शोरूम व कार्यालय सुरू केले होते. अफरोज बशीरखान पठाण याने विक्रांत नंदकिशोर गजपुरे यांचे टिनशेड भाड्याने घेऊन TEHPG PRIVATE LIMITED AND ENTERPRISES आणि F.Y.R. EV या नावांनी इलेक्ट्रिक स्कुटी विक्रीचे शोरूम सुरू केल्याचे तक्रारीत नमूद आहे.
या शोरूममध्ये संजय आसाराम कुये आणि विक्रांत नंदकिशोर गजपुरे यांना व्यवस्थापक म्हणून ठेवण्यात आले होते. त्यांच्या माध्यमातून ग्राहकांना स्वस्त दरात इलेक्ट्रिक मोपेड देण्याचे आमिष दाखविण्यात आले. वाहन बुकिंगसाठी प्रत्येकी १ हजार ५०० ते २ हजार ५०० रुपये, तर डाऊन पेमेंटच्या नावाखाली ७ हजार ५०० ते १० हजार रुपयांपर्यंत रक्कम स्वीकारण्यात आल्याचा आरोप आहे. मात्र, पैसे स्वीकारल्यानंतर ग्राहकांना वाहनांची डिलिव्हरी देण्यात आली नाही तसेच बुकिंग व डिपॉझिटची रक्कमही परत करण्यात आली नसल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
या प्रकरणात सुमारे ३०० लोकांची फसवणूक झाल्याचा आरोप तक्रारदाराने केला आहे. यापूर्वी १० जून २०२६ रोजी उपविभागीय पोलीस अधिकारी, ब्रह्मपुरी यांच्याकडे लेखी तक्रार देण्यात आली होती. त्यानंतर करण्यात आलेल्या चौकशीत तक्रारदारासह इतर साक्षीदारांची २ लाख ६६ हजार ९१८ रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याचे निष्पन्न झाल्याने आरोपी अफरोज बशीरखान पठाण, संजय आसाराम कुथे आणि विक्रांत नंदकिशोर गजपुरे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
नागभीड पोलीस ठाण्याचे ठाणेदार रमाकांत कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अनिल डोंगरवार पुढील तपास करीत आहेत.




Petrol Price




