चोरीला गेलेले ३.३० लाखांचे सोन्याचे दागिने परत : गोबरवाही पोलिसांना यश


- तुमसर न्यायालयाच्या आदेशानंतर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण; सुनीता गेदाम यांना दागिने सुपूर्द, पीडित कुटुंबाला मोठा दिलासा
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / भंडारा : चोरीच्या गुन्ह्याचा यशस्वी तपास करून सुमारे ३ लाख ३० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात गोबरवाही पोलिसांना यश आले आहे. जप्त केलेले सर्व दागिने न्यायालयाच्या आदेशानुसार आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून मूळ तक्रारदाराला परत करण्यात आले. पोलिसांच्या या कारवाईमुळे पीडित कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गोबरवाही पोलिस ठाण्याच्या हद्दीत सोन्याचे दागिने चोरीला गेल्याची घटना घडली होती. याप्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवली. तपास पथकाने विविध दिशांनी तपास करून चोरीला गेलेले मौल्यवान सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात यश मिळवले. या दागिन्यांची किंमत सुमारे ३ लाख ३० हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले.
चोरीला गेलेली मालमत्ता मूळ मालकाला परत मिळावी यासाठी पोलिसांनी न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण केली. तुमसर येथील प्रथम वर्ग न्यायालयाच्या आदेशानुसार, २९ ऑक्टोबर रोजी आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पार पाडून तक्रारदार सुनीता आनंदराव गेदाम (रा. गोबरवाही, ता. तुमसर) यांना त्यांचे सोन्याचे दागिने परत करण्यात आले.
गोबरवाही पोलिस ठाण्याचे अधिकारी अभिजीत पाटील आणि त्यांच्या तपास पथकाने ही कारवाई यशस्वीरीत्या पार पाडली. चोरीला गेलेले दागिने पुन्हा मिळाल्याने गेदाम कुटुंबाला दिलासा मिळाला असून, पोलिसांच्या तपासाबद्दल समाधान व्यक्त होत आहे.




Petrol Price




