युवक व अल्पवयीन मुलगी आले रेल्वेसमोर, मुलगी ठार, युवक गंभीर जखमी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / वरोरा :
नवी दिल्ली - चेन्नई रेल्वेमार्गावर धावत्या रेल्वेसमोर एक युवक व अल्पवयीन मुलगी उभे राहिले. रेल्वेने दोघांनाही उडविल्याने मुलगी ठार झाली असून युवक गंभीर जखमी झाला आहे. सदर अपघात विस्लोन गावानजीक पोल क्रमांक ८३८/६  नजीक आज १५ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास घडला. 
भद्रावती तालुक्यातील माजरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत येत असलेल्या विस्लोन गावानजीक नवीदिल्ली - चेन्नई रेल्वेमार्गावर एक युवक व मुलगी रेल्वेला धडकल्याचे निदर्शनास आले. परिसरात काम करीत असलेले शेतकरी घटनास्थळाकडे धावले. यावेळी मुलगी जागीच ठार झाल्याचे आढळून आले. महेंद्र दिलीप दान (२३) रा. विस्लोन असे गंभीर जखमी युवकाचे नाव आहे. त्याला वरोरा येथील उपजिल्हा रूग्णालयात भरती करण्यात आले आहे. अल्पवयीन मुलगी यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव येथे इयत्ता अकरावीत शिकत होती. दोघांनी आत्महत्येचा प्रयत्न केला की अन्य काही याबाबत माहिती मिळू शकली नाही. पुढील  तपास माजरी पोलिस करीत आहेत.

   Print


News - Chandrapur | Posted : 2018-09-15


Related Photos