सावली ग्रामीण रुग्णालयाची रुग्णवाहिकाच आजारी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी  / सावली  :
तालुक्याचे मुख्यालय असून तालुक्याच्या ठिकाणी एकमेव ग्रामीण रुग्णालय आहे. परिसरातील जनतेला आरोग्याची सोय उपलब्ध व्हावी या उदात्त हेतूने ग्रामीण रुग्णालयाची निर्मिती करण्यात आली. आरोग्याच्या हितासाठी शासन लाखो रुपये खर्च करीत असले तरी सावली येथील ग्रामीण रुग्णालयातील रुग्णवाहिका मागील पंधरा दिवसांपासून नादुरुस्त असल्याने रूग्णाच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
तालुक्याच्या मुख्यालयी ग्रामीण रुग्णालय असल्याने परिसरातील बरेचसे रुग्ण उपचाराकरिता ग्रामीण रुग्णालयात येतात. रुग्णांना वेळेवर उपचार मिळावा यासाठी रुग्णवाहिकेची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार मागील दीड वर्षापूर्वी वरोरा येथील ग्रामीण रुग्णालयातील जुनी रुग्णवाहिका या रुग्णालयाला देण्यात आली. रुग्णालयाला रुग्णवाहिका उपलब्ध झाली तेव्हापासून अनेकदा बिघाड आला आणि दुरुस्तीकरिता पंधरा पंधरा दिवसाचा कालावधी लागत होता.  त्यादरम्यान अतिगंभीर रुग्णांना जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती करताना रुग्णवाहिकेचे साठी भटकावे लागत असल्याचे वास्तव आहे.  रुग्णाला तात्काळ सेवा देण्यासाठी रुग्णवाहिका ही अत्यावश्यक बाब असली तरी मात्र या रुग्णालयातील रुग्णवाहिका नेहमीचं नादुरुस्त आजारी असल्याचे निदर्शनास येते. रुग्णाच्या नातेवाईकांना रुग्णवाहिका मिळवण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत असून नाईलाजाने रुग्णांच्या नातेवाईकांना खाजगी रुग्णवाहीकेचा सहारा घेऊन रुग्णाला रेफर करण्याची वेळ आली आहे.  त्यामुळे रुग्णाच्या नातेवाईकांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. या परिस्थिती मध्ये एखाद्या रुग्णाचा जीव गेल्यास याला जबाबदार कोण ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. अशा गंभीर बाबीकडे लोकप्रतिनिधी व प्रशासनाने जातीने लक्ष देऊन ही समस्या त्वरित निकाली काढण्याची मागणी होत आहे.

- आरोग्य सेवा ही अतिआवश्यक सेवा आहे रुग्णवाहिका नादुरुस्त असणे ही अती गंभीर बाब असून परिसरातील जनतेला तात्काळ आरोग्यसेवा मिळण्याकरिता या रुग्णालयात अद्यावत नवीन रुग्णवाहिका उपलब्ध करून द्यावी.
- विजय कोरेवार, सभापती पंचायत समिती, सावली

- सावलीच्या ग्रामीण रुग्णालयात रुग्णवाहिकेची अत्यंत आवश्यकता असताना आरोग्य प्रशासन याकडे गंभीरतेने लक्ष देत नाही. येत्या आठ दिवसात अद्यावत नवीन रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्यास वंचित बहुजन आघाडी तर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल. 
 - रोशन बोरकर, शहराध्यक्ष वंचित बहुजन आघाडी
 
-ग्रामीण रुग्णालयातील रुग्णवाहिका दुरुस्तीसाठी पाठवले असून लवकरात लवकर दुरुस्ती करून देण्यासाठी पाठपुरावा केला आहे. दोन-तीन दिवसात या रूग्णालयाला रुग्णवाहिका उपलब्ध होईल.
 - डॉक्टर मडावी, वैद्यकीय अधीक्षक ग्रामीण रुग्णालय, सावली
  Print


News - Chandrapur | Posted : 2020-02-27


Related Photos