सडलेल्या अन्नामुळे चामोर्शी मार्गावर ‘माॅर्निंग वाॅक’ ला जाणाऱ्यांचा श्वास गुदमरतोय !


- कार्यक्रमानंतर उरलेले अन्न टाकले जातेय रस्त्याच्या बाजूलाच 
- नगर परिषदेने लक्ष देण्याची गरज
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
अजय कुकडकर  / गडचिरोली :
कार्यक्रमांदरम्यान उरलेले अन्न चामोर्शी मार्गावर मोक्याच्या ठिकाणी रस्त्यालगत टाकून दिले जात आहे. यामुळे अन्न सडून प्रचंड दुर्गंधी पसरली आहे. या प्रकारामुळे सकाळी तसेच सायंकाळी फिरायला जाणाऱ्या नागरिकांचा श्वास गुदमरत आहे. तसेच आवागमन करणाऱ्या  वाहनधारकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. या प्रकाराकडे नगर परिषदेने लक्ष देवून सबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे.
सध्या कार्यक्रमांची रेलचेल आहे. यामुळे अनेक नागरिकांच्या घरी तसेच चामोर्शी मार्गांवर असलेल्या सभागृह व लाॅनममध्ये भोजनांचे आयोजन केले जात आहे. कार्यक्रमानंतर उरलेले अन्न तसेच इतर साहित्य शासकीय विज्ञान महाविद्यालयानंतर रस्त्याच्या बाजूलाच टाकून दिले जात आहे. हे अन्न सडल्यामुळे कित्येक अंतरापर्यंत दुर्गंधी पसरली आहे. सध्या हिवाळ्यास प्रारंभ होत असून उत्तम आरोग्य लाभावे यासाठी ‘माॅर्निंग वाॅक‘ ला येणाऱ्या नागरिकांना याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. अन्न टाकून राहत असल्यामुळे डूकरांचा सुध्दा प्रचंड उपद्व्याप वाढला आहे. रोजच कुणी ना कुणी अन्न आणून टाकत असल्यामुळे दुर्गंधी प्रचंड वाढत आहे. यामुळे वेळीच या प्रकारावर आळा घालण्यासाठी नगर परिषदेने पुढाकार घ्यावा, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

   Print


News - Gadchiroli | Posted : 2018-09-23


Related Photos