एसटी महामंडळाचे 'उत्पन्न वाढवा विशेष अभियान' सुरु


- प्रवासी वाढविणाऱ्या एसटी आगारांना लाखोंची बक्षीसे मिळणार , परिवहन मंत्री अनिल परब यांनी केली घोषणा

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / मुंबई :
एसटी महामंडळाने १ मार्च ते ३० एप्रिल २०२० या दोन महिन्यांचे 'उत्पन्न वाढवा विशेष अभियान' सुरू केले आहे. सर्वाधिक उत्पन्न आणणाऱ्या आगारांना दोन लाख रुपयांच्या प्रथम पारितोषिकासह विविध बक्षिसे देण्यात येणार असल्याची घोषणा परिवहनमंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब यांनी केली आहे. निकृष्ट कामगिरी करणाऱ्या आगाराचीही यापुढे खैर करणार नाही. अशा आगार प्रमुखांवर कारवाई करण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
एसटीचे प्रवासी उत्पन्न वाढावे यासाठी विविध स्तरावर उपाययोजना करण्याचे निर्देश अनिल परब यांनी आपल्या पहिल्याच बैठकीमध्ये दिले होते. त्यानुसार महामंडळाच्या वाहतूक विभागाने सादर केलेल्या प्रस्तावाला मान्यता देत असताना परब यांनी स्पर्धेच्या माध्यमातून उत्पादकता वाढवण्याची गरज व्यक्त केली होती. त्यानुसार एसटीच्या २५० आगारांची (डेपोची) प्रदेशनिहायहाय विभागणी करून प्रत्येक प्रदेशातील सर्वोत्कृष्ट कामगिरी करून उत्पन्नामध्ये मागील वर्षाच्या तुलनेत सर्वाधिक उत्पन्न आणणाऱ्या प्रथम क्रमांकाच्या आगारास दरमहा २ लाख रुपये, द्वितीय आगारास १. ५ लाख रुपये व तृतीय आगारास १  लाख रुपये असे बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. याबरोबरच महामंडळाच्या ३१ विभागापैकी सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विभागांनाही आगाराप्रमाणे प्रथम क्रमांक २ लाख रुपये, द्वितीय क्रमांकास १.५ लाख रुपये व तृतीय क्रमांकास १ लाख २५ हजार रुपये असे रोख बक्षिसे देण्यात येणार आहेत. अर्थात हे अभियान प्रयोगिक तत्वावर १ मार्च ते ३० एप्रिल २०२० या दोन महिन्यांच्या कालावधीसाठी राबविण्यात येत आहे.
निकृष्ट कामगिरी करणाऱ्या आगाराचीही आता खैर करण्यात येणार नाही. त्याबद्दल जबाबदार अधिकाऱ्यांना शिक्षा करण्याचे प्रस्तावित आहे. निकृष्ट कामगिरी करणाऱ्या आगारातील अधिकाऱ्यांचे गोपनीय अहवाल राखून ठेवणे, त्यांची बदली करणे असे या शिक्षेचे स्वरूप असणार आहे. त्यामुळे केवळ बक्षिसासाठीच नव्हे तर शिक्षेपासून बचावण्यासाठीही सर्व २५० आगारांनी आपली कार्यक्षमता वाढवावी हा हेतू आहे.  Print


News - Rajy | Posted : 2020-02-23


Related Photos