शासन जिल्ह्यातील प्रलंबित प्रश्न नियोजनपूर्वक सोडवणार : गृहमंत्री अनिल देशमुख


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली :
जिल्ह्यातील दुर्गम भागातील नक्षलवाद  तसेच विकासात्मक इतर कामांमधील प्रलंबित प्रश्न नियोजनपूर्वक टप्प्याटप्प्याने  हे शासन सोडवणार आहे असे प्रतिपादन राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पत्रकार परिषदेमध्ये केले. गडचिरोली जिल्ह्यात ते गृहमंत्री झाल्यानंतर प्रथमच आले होते. यावेळी त्यांनी पोलीस आणि महसूल विभागातील विविध विषयांवर बैठक घेतली. यावेळी आमदार धर्मरावबाबा आत्राम, जिल्हाधिकारी दीपक सिंगला, पोलीस उपमहानिरीक्षक महादेव तांबडे, पोलीस अधिक्षक शैलेश बलकवडे उपस्थित होते.
गृहमंत्री यांनी यावेळी शहिद स्मारक येथे  शहिद झालेल्या वीर जवानांना श्रद्धांजली वाहिली. यानंतर जिल्ह्यातील विविध विषयांवर अधिकाऱ्यांशी चर्चा करुन आढावा घेतला. यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, जिल्ह्यातील विकासाचा दृष्टीने  विविध कामांचा प्राधान्‍यक्रम ठरवून कामे केली जाणार आहेत. यामध्ये विविध टप्प्यांचा समावेश केला जाईल. अत्यावश्यक कामे हाती घेतली असून लवकरच त्यावर शासन तोडगा काढत आहे. भरती प्रक्रियेबाबात कॅबिनेट बैठकीमध्ये लवकरच चर्चा करुन  सकारात्मक निर्णय घेण्यात येतील. राज्यात पोलीस व सुरक्षा रक्षक भरती लवकरच सुरु होणार आहे. यामध्ये गडचिरोलीतील तरुणांनाही संधी आहे. तसेच जिल्ह्यातील थांबलेली भरती लवकरच सुरु करण्यासाठी राज्यस्तरावर कॅबिनेट निर्णय घेणार आहे. जिल्ह्यातील रोजगार निर्मितीबाबत सुरजागड सारख्या प्रकल्पातून चालना देता येईल याबाबतही शासन प्रयत्नशील आहे असे ते यावेळी म्हणाले.
मेडीगट्टा येथील सिंचन प्रकल्पामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना योग्य मोबदला देण्यासाठी तेथील कार्यकारी अभियंता व आपल्या जलसंधारण विभागाची महत्वपुर्ण बैठक झाली. यामध्ये शेतकऱ्यांना नक्कीच योग्य मोबदला देण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. धान खरेदी प्रलंबित असल्याबाबत विचारलेल्या प्रश्नांवर त्यांनी याबाबत नव्याने दोन जिल्ह्यांचा समावेश खरेदीसाठी केला असून त्याबाबत तोडगा निघाल्याचे सांगितले. जिल्ह्यात स्वर्गीय आर.आर. पाटील यांच्या पुतळयाची निर्मिती  करण्याबाबत मोठया प्रमाणात मागणी होत आहे. यावरही आम्ही लवकरच निर्णय घेवू असे ते म्हणाले.
राज्याच्या दृष्टीने यावेळी त्यांनी विविध विषयांवर प्रश्नांना उत्तरेही दिली. नागरिकत्व नोंदणी व पडताळणी बाबत ते म्हणाले की यामुळे महाराष्ट्रातील कोणत्याही व्यक्तीचे चुकिच्या पद्धतीने नागरीकत्व  जाणार नाही. यानंतर त्यांनी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे बरोबरही चर्चा करुन जिल्ह्यातील प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी चर्चा करणार असल्याचे सांगितले

 
  Print


News - Gadchiroli | Posted : 2020-02-22


Related Photos