३ आरोपींकडून चोरी व घरफोडीचे तीन गुन्हे उघडकीस, तीन आरोपींना केली अटक


- आरोपींकडून १ लाख ८० हजारांचा मुद्देमाल हस्तगत, बल्लारपूर पोलिसांची विशेष कार्यवाही

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर :
बल्लारपूर पोलिसांनी विशेष कार्यवाही करीत ३ आरोपींकडून चोरी व घरफोडीचे तीन गुन्हे उघडकीस आणले. या प्रकरणातील तीन आरोपींना अटक करीत त्यांच्याकडून एकूण १ लाख ८० हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या कारवाईमुळे चोरांमध्ये धडकी भरली आहे. कोणीतरी अज्ञात इसमाने त्यांच्या घरात प्रवेश करून घरातील सोने-चांदीचे दागिने व इतर साहित्य असा एकूण २७ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची तक्रार फिर्यादी लहानु पाझारे रा. जाकीर हुसेन वार्ड बल्लारपूर यांनी ७ जानेवारी २०२० रोजी पोलिस स्टेशन बल्लारपूर येथे दिली. यावरून पोलिस स्टेशन बल्लारपूर येथे अपराध क्रमांक २६/२०२० भादंवि कलम ४५४, ४५७, ३८० अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला. त्यानंतर वरिष्ठ अधिकारी यांच्या मार्गदर्शनात सदर गुन्ह्याचा तपास गुन्हे शोध पथक बल्लारपूर यांच्याकडे सोपविण्यात आला. गुन्हे शोध पथकाने लागलीच तपासचक्रे फिरविली. तांत्रिक बाबींवर आणि गोपनीय माहिती काढून गुन्हे शोध पथकाने वेगवेगळ्या पद्धतीने माहिती गोळा केली. दरम्यान, मौलाना आझाद वार्ड येथील तीन इसमांना ताब्यात घेण्यात आले. सदर इसमांना गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता त्यांनी ७ जानेवारी २०२० रोजी फिर्यादीच्या घरी चोरी केल्याचे कबूल केले. यावरून दीपक उर्फ गब्बर रामप्रसाद निषाद (२८), दर्शन उर्फ बापू अशोक तेलंग (२०), आकाश उर्फ प्रिन्स रवी गोगुर्ले (१९) सर्व रा. मौलाना आझाद वार्ड बल्लारपूर यांना अटक करण्यात आली. सदर आरोपींचा न्यायालयातून पोलिस कोठडी रिमांड घेवून आरोपींची इतर गुन्हे्याबाबत सखोल चैकशी केली असता सदर तिन्ही आरोपींनी यापूर्वीही दोन गुन्हे केल्याची कबुली दिल्याने आरोपींकडून तिन्ही गुन्ह्यात चोरीस गेलेले १ लाख ५५ हजार ६०० रुपये किंमतीचे ३८ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व २५ हजार रुपये किंमतीचे ५ मोबाईल फोन असा एकूण १ लाख ८० हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. सदर कारवाई चंद्रपूरचे प्रभारी पोलिस अधीक्षक प्रशांत खैरे व राजुराचे उपविभागीय पोलिस अधिकारी स्वप्निल जाधव यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक शिवलाल भगत यांच्या नेतृत्वात सहायक पोलिस निरीक्षक विकास गायकवाड, पोलिस हवालदार सुनील कांबळे, पोलिस नाईक संतोष दंडेवार, सुधाकर वरघणे, पोलिस शिपाई शेखर मातनकर, शरद कुडे, श्रीनिवास वाबीटकर, स्वप्निल दरेकर यांनी केली आहे.  Print


News - Chandrapur | Posted : 2020-02-21


Related Photos