अपघाताचे हॉटस्पॉट बनला राष्ट्रीय महामार्ग : रस्ता दुरुस्तीची वंचितची मागणी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / बल्लारपूर : बल्लारपूर शहरातून जाणाऱ्या चंद्रपूर - हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग तसेच बल्लारपूर - आलापल्ली मार्ग अवस्था अत्यंत बिकट झाली असून ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडल्याने हा मार्ग अपघातांचा हॉटस्पॉट बनला आहे. पावसाचे पाणी खड्ड्यांमध्ये साचत असल्याने वाहनचालकांना खड्ड्यांच्या खोलीचा अंदाज येत नसून अपघातांचा धोका वाढला आहे. त्यामुळे महामार्गाची तातडीने दुरुस्ती करून वाहतूक सुरक्षेच्या उपाययोजना कराव्यात, अशी मागणी वंचित बहुजन महिला आघाडी व युवा आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे.
या संदर्भात तहसीलदार बल्लारपूर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता तसेच पोलीस निरीक्षक बल्लारपूर यांना निवेदन देण्यात आले. तहसील कार्यालयामार्फत जिल्हाधिकारी कार्यालय, चंद्रपूर तसेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडेही निवेदनाची प्रत पाठविण्यात आली. बल्लारपूर शहरातून जाणारा हा महामार्ग विदर्भ आणि तेलंगणाला जोडणारा महत्त्वाचा मार्ग आहे. या मार्गावर दररोज मोठ्या प्रमाणात अवजड वाहने, बस, शालेय वाहने आणि दुचाकींची वर्दळ असते. मात्र रस्त्याच्या मध्यभागी असलेल्या खड्ड्यांमुळे वाहनचालकांना अचानक ब्रेक लावावा लागतो. परिणामी मागून येणाऱ्या वाहनांना धडक होऊन अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
गेल्या महिनाभरात ४ ते ५ मोठे अपघात या मार्गावर झाल्याचा दावा स्थानिक नागरिकांनी केला आहे. पावसाचे पाणी खड्ड्यांमध्ये साचल्यामुळे दुचाकीस्वार घसरून पडण्याच्या घटनाही घडत आहेत. शाळकरी विद्यार्थी आणि पादचाऱ्यांसाठीही महामार्ग ओलांडणे धोकादायक बनले आहे. महामार्गावरील सर्व खड्डे तातडीने बुजवून डांबरीकरण करावे, अपघातप्रवण ठिकाणी वाहतूक पोलिसांची कायमस्वरूपी नियुक्ती करावी, महत्त्वाच्या चौकांमध्ये ट्रॅफिक सिग्नल, वेगमर्यादा फलक व झेब्रा क्रॉसिंगची व्यवस्था करावी तसेच रस्त्याच्या कडेला पाणी निचऱ्याची योग्य व्यवस्था करावी, अशा विविध मागण्या निवेदनातून करण्यात आल्या आहेत.
राष्ट्रीय महामार्ग हा शहराची जीवनवाहिनी आहे. वेळीच दुरुस्ती न झाल्यास मोठी जीवितहानी होऊ शकते. प्रशासनाने १५ दिवसांत कार्यवाही न केल्यास वंचित बहुजन आघाडीच्या वतीने महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शहराध्यक्ष रेखा पागडे यांनी दिला. निवेदन देताना वंचित बहुजन युवा आघाडीचे तालुका अध्यक्ष अभिलाष चुनारकर, उमेश कडू, जिल्हा वरिष्ठ सल्लागार सत्यभामा भाले, शहर संघटक राकेश पेटकर, जोशीला वाघाडे, वरिष्ठ सल्लागार आशा भाले, अलका आलोने, इंदु खरतड यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.




Petrol Price




