महत्वाच्या बातम्या

 जरीपटका येथे प्रतिबंधित सुगंधित तंबाखूचा साठा जप्त


- ५६ हजारांचा मुद्देमाल हस्तगत; मयूर यादवला अटक, पोलिसांच्या कथित पाठबळाची चर्चा

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर : शासनाने प्रतिबंधित केलेल्या सुगंधित तंबाखूची अवैध विक्री आणि तस्करी केल्याच्या आरोपावरून पोलिसांनी मयूर अशोक यादव ४० वर्षे  रा. पवनपुत्र सोसायटी, जरीपटका) याला अटक केली. परिमंडळ क्रमांक ६ चे पोलिस उपायुक्त रमेश धुमाळ यांच्या निर्देशानुसार करण्यात आलेल्या कारवाईत आरोपीच्या घरातून विविध कंपन्यांच्या सुगंधित तंबाखूची २४.८४० किलो वजनाची पाकिटे, पाऊच आणि तंबाखूचे डबे जप्त करण्यात आले. जप्त करण्यात आलेल्या प्रतिबंधित पानमसाला व तंबाखूजन्य पदार्थांची एकूण किंमत ५६ हजार ४८५ रुपये असल्याचे सांगण्यात आले.

गोपनीय माहितीच्या आधारे घरावर छापा -
मयूर यादव हा गेल्या अनेक दिवसांपासून प्रतिबंधित सुगंधित तंबाखूची तस्करी करून त्याची अवैध विक्री करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीची दखल घेत परिमंडळ क्रमांक ६ चे पोलिस उपायुक्त रमेश धुमाळ यांनी आपल्या पथकाला संबंधित ठिकाणी कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानुसार, पोलिस पथकाने शनिवारी दुपारी यादव याच्या घरी छापा घातला. या वेळी घरात विविध कंपन्यांच्या सुगंधित तंबाखूची पाकिटे, पाऊच तसेच तंबाखूचे डबे आढळून आले. पोलिसांनी हा साठा जप्त करून आरोपीविरुद्ध कारवाई केली.

विविध कंपन्यांच्या तंबाखूचा साठा -
छाप्यादरम्यान राजश्री, विमल, पिके आणि केपी ब्लॅक आदी कंपन्यांची पाकिटे व पाऊच पोलिसांना आढळले. याशिवाय तंबाखूचे डबेही जप्त करण्यात आले. सुगंधित तंबाखूच्या पाकिटांचे एकूण वजन २४.८४० किलो असून, प्रतिबंधित पानमसाला व तंबाखूच्या साठ्याची किंमत ५६ हजार ४८५ रुपये आहे. या प्रकरणी हवालदार रोमेश मेनेवार यांच्या तक्रारीवरून जरीपटका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. भारतीय न्याय संहितेच्या कलम १२३, २२३, २७४ व २७५ तसेच अन्न सुरक्षा व मानके अधिनियम, २००६ मधील संबंधित कलमांन्वये ही कारवाई करण्यात आली आहे.

पोलिस कर्मचाऱ्यांच्या कथित पाठबळाची चर्चा -
दरम्यान, आरोपी यादव याला जरीपटका पोलिस ठाण्यातील काही कर्मचाऱ्यांचे कथित पाठबळ असल्यानेच तो उघडपणे गुटखा आणि प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करीत होता, अशी चर्चा परिसरात सुरू आहे. मात्र, या आरोपांना अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. त्यामुळे या कथित संबंधांबाबत वस्तुस्थिती तपासातून स्पष्ट होणे आवश्यक आहे.

तस्करीच्या साखळीचा उलगडा होणार? -
आरोपी यादव याला जप्त मुद्देमालासह जरीपटका पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून, पुढील तपास सुरू आहे. प्रतिबंधित तंबाखूचा साठा नेमका कुठून आणला जात होता, त्याची विक्री कोणाला केली जात होती आणि या व्यवहारात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपासातून उलगडा होण्याची शक्यता आहे. प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांच्या अवैध विक्रीला आळा घालण्यासाठी अशा प्रकारच्या कारवाया सातत्याने होणे आवश्यक आहे.





  Print






Related Photos