'एटीएस'ची कारवाई : मुंबई, ठाणे, पुणे, सांगली, सातारा, सोलापूर येथून १३ जणांना घेतले ताब्यात


-   दहा पिस्तुल, गावठी कट्टा, एअरगन, दहा पिस्तुल बॅरल, चॉपर जप्त 
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
 प्रतिनिधी / मुंबई : 
महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) नालासोपारा येथे मोठी कारवाई केल्यानंतर शनिवारी राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये छापे टाकून १३ जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. हे सर्वजण कोणत्या ना कोणत्या हिंदुत्ववादी संघटनेचे कार्यकर्ते असून अटक करण्यात आलेल्या वैभव राऊत, शरद कळस्कर आणि सुधन्वा गोंधळेकर यांच्या संपर्कात होते. एटीएसच्या पथकाने सुधन्वा याच्या पुणे येथील घरातून दहा पिस्तुल, गावठी कट्टा, एअरगन यांसह मोठा शस्त्रसाठा जप्त केला.
हिंदुत्ववादी संघटनेसाठी कार्यरत असलेला वैभव राऊत आपल्या साथीदारांसह घातपात घडविण्याचा कट करीत असल्याची माहिती मिळाल्यानंतर एटीएसने गुरुवारी त्याच्या नालासोपारा येथील निवासस्थानी आणि दुकानावर छापा टाकला. २० गावठी बॉम्बसह स्फोटकांचा मोठा साठा हस्तगत करण्यात आला. त्याच्या संपर्कात असलेल्या शरद कळस्कर याला नाल्यासोपाऱ्यातून तर सुधन्वा गोंधळेकर याला पुण्यातून पकडण्यात आले. राज्यातील विविध जिल्ह्यांतील अनेक तरुण या तिघांच्या संपर्कात असल्याचे चौकशीतून समोर आल्याने एटीएसच्या पथकांनी मुंबई, ठाण्यासह पुणे, सांगली, सातारा, सोलापूर येथे शनिवारी दिवसभर छापे टाकले. या छाप्यांमध्ये १३ जणांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. यापैकी कुणाचा या कटात सहभाग आढळल्यास अटकेची कारवाई केली जाईल, असे एटीएसच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. 
सुधन्वा याला शुक्रवारी अटक केल्यानंतर शनिवारी तो राहात असलेल्या पुण्यातील भागात एटीएसने झाडाझडती घेतली. यामध्ये दहा पिस्तुल (मॅगझिनसह), एक गावठी कट्टा, एक एअरगन, दहा पिस्तुल बॅरल, सहा निर्माणाधीन पिस्तुल, तीन निर्माणाधीन मॅगझिन, सात निर्माणाधीन पिस्तुल स्लाइड, सोळा रिले स्विच, वाहनांच्या सहा नंबर प्लेट्स, एक ट्रिगर मेकॅनिझम, एक चॉपर, एक चाकू, अर्धवट बनवलेले शस्त्राचे सुटे भाग, बॅटरी, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू इत्यादी साठा सापडला. 
शस्त्रसाठ्याबरोबरच विविध स्फोटकांची माहिती असणारी पुस्तके सुधन्वा याच्याकडे सापडली. बॉम्ब बनविण्याची प्रक्रिया असलेले हॅण्डबूक, सर्किटचे रेखाचित्र, मोबाइल प्रिंटआऊट, पेन ड्राइव्ह, हार्ड डिस्क, मेमरी कार्ड्स यांसारखे साहित्यही जप्त करण्यात आले. पेन ड्राइव्ह, हार्ड डिस्कमधून बरीच महत्त्वपूर्ण माहिती हाती लागण्याची शक्यता असल्याचे एटीएसने म्हटले आहे.    Print


News - Rajy | Posted : 2018-08-12


Related Photos