विद्यार्थ्यांनी काढली दारू, खर्रा व तंबाखूची प्रतिकात्मक अंत्ययात्रा


- पथनाट्यातून दिला व्यसनमुक्तीचा संदेश
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / अहेरी :
तंबाखूमुक्त संकल्पित शाळा उपक्रमांतर्गत तालुक्यातील उमानूर येथील भगवंतराव प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांनी दारू, खर्रा व तंबाखूची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढून जनजागृती केली. सोबतच दारू व तंबाखू सेवनाने होणारे दुष्परिणाम दाखविणारे पथनाट्य सादर करून ग्रामस्थांना व्यसनमुक्तीचा संदेशही दिला.  
मुक्तिपथ आणि एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत जनजागृती व कृती कार्यक्रम घेऊन आश्रमशाळा तंबाखूमुक्त करण्याचे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे. विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून जनजागृती केली जात आहे. तंबाखूमुक्त संकल्पित शाळेसाठी ११ निकष पूर्ण करण्यावर भर दिला जात आहे. आपल्या शाळेतून खर्रा व तंबाखू आणि गावातून या दोन्ही पदार्थांसह दारू हद्दपार करण्यासाठी उमानूर येथील भगवंतराव प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांनी व्यापक जनजागृती उपक्रम हाती घेतला. आज सकाळी सर्वप्रथम या विद्यार्थ्यांनी मुक्तिपथ तालुका चमू आणि शिक्षकांच्या मदतीने दारू, खर्रा व तंबाखूची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढली. यमराज आणि चित्रगुप्त अशी वेशभूषा केलेले विद्यार्थी या अंत्ययात्रेत सहभागी झाले होते. शाळेतून ही अंत्ययात्रा गावातील मुख्य चौकात आल्यावर येथे विद्यार्थ्यानी दारू व खर्रा सेवनाने होणारे दुष्परिणाम दाखविणारी दोन पथनाट्य सादर करून व्यसन सोडण्याचे भावनिक आवाहन ग्रामस्थांना केले. त्यानंतर गावातील मुख्य चौकात दारू, खर्रा व तंबाखूच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले. शाळेतील जवळपास ३५० विद्यार्थी या उपक्रमात सहभागी झाले होते. दारू व खर्रा सोडण्याच्या घोषणाही विद्यार्थ्यांनी यावेळी दिल्या. शाळेतील शिक्षक शहारे, वासाडे, निकोडे, वाढई, गोंगले, बोरकर, नामनवार, बोगारे, गांगरेड्डीवार, मंडावी, पोटलापल्ली, आदीसह शिक्षकेत्तर कर्मचारी आणि मुक्तिपथ प्रेरक मारोती कोलावार यांनी कृती कार्यक्रमासाठी सहकार्य केले.   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-12-14


Related Photos