महत्वाच्या बातम्या

 हिवाळी अधिवेशनासाठी लिपिक-टंकलेखक व शिपाई पदांची भरती


- लिपिक-टंकलेखकाची १०, तर शिपाई-संदेशवाहकाची २४ पदे; पात्र उमेदवारांना संधी

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर : महाराष्ट्र विधिमंडळाच्या नागपूर येथे होणाऱ्या आगामी हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर लिपिक-टंकलेखक आणि शिपाई/संदेशवाहक या पदांवर एकूण ३४ उमेदवारांची तात्पुरत्या स्वरूपात नियुक्ती करण्यात येणार आहे. यामध्ये लिपिक-टंकलेखकाची १०आणि शिपाई/संदेशवाहकाची २४  पदे आहेत. इच्छुक व पात्र उमेदवारांनी ९ नोव्हेंबरपर्यंत अर्ज सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सोमवार, ७ डिसेंबर २०२६ पासून विधानभवन, नागपूर येथे सुरू होणार आहे. या अधिवेशनाच्या कालावधीसाठी पूर्णतः हंगामी स्वरूपात ही पदे भरली जाणार आहेत. लिपिक-टंकलेखक पदासाठी एस-६ वेतनश्रेणी (१९,९०० ते ६३,२०० रुपये), तर शिपाई/संदेशवाहक पदासाठी एस-१ वेतनश्रेणी (१५,००० ते ४७,६०० रुपये) लागू राहील. याशिवाय नियमानुसार देय भत्ते मिळतील.

लिपिक-टंकलेखक पदासाठी पात्रता -
या पदासाठी उमेदवार बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच मराठी टंकलेखनाचा वेग प्रतिमिनिट ३० शब्द आणि इंग्रजी टंकलेखनाचा वेग प्रतिमिनिट ४० शब्द असावा. उमेदवाराने एमएस-सीआयटी किंवा समकक्ष संगणक परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. खुल्या प्रवर्गासाठी वयोमर्यादा १८ ते ३८ वर्षे, तर मागासवर्गीय उमेदवारांसाठी १८ ते ४३ वर्षे आहे.

शिपाई-संदेशवाहक पदासाठी पात्रता -
शिपाई/संदेशवाहक पदासाठी किमान चौथी उत्तीर्ण किंवा त्यापेक्षा उच्च शैक्षणिक पात्रता आवश्यक आहे. खुल्या प्रवर्गातील उमेदवारांचे वय १८ ते ३८ वर्षे, तर मागासवर्गीय उमेदवारांचे वय १८ ते ४३ वर्षे असावे. याशिवाय सायकल किंवा दुचाकी चालविता येणे आवश्यक आहे.

२६ व २८ नोव्हेंबरला चाचण्या -
शिपाई/संदेशवाहक पदासाठी पात्र उमेदवारांची मौखिक चाचणी गुरुवार, २६ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ११.३० वाजल्यापासून विधानभवन, नागपूर येथे घेण्यात येईल. लिपिक-टंकलेखक पदासाठी पात्र उमेदवारांची टंकलेखन चाचणी शनिवार, २८ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ११.३० वाजल्यापासून होणार आहे.

 





  Print






Related Photos