सेवा संकल्प अभियानांतर्गत ७६ अतिजोखमीच्या बालकांची प्राथमिक श्रवण तपासणी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : सेवा संकल्प अभियान अंतर्गत जिल्हा शीघ्र हस्तक्षेप केंद्र (DEIC), जिल्हा महिला व बाल रुग्णालय गडचिरोली येथे SNCU मध्ये उपचार घेतलेल्या अतिजोखमीच्या बालकांची श्रवणविषयक प्राथमिक तपासणी करण्यात आली.
या उपक्रमांतर्गत कमी वजनाने जन्मलेली (LBW) व मुदतपूर्व जन्मलेली (Preterm) अशा एकूण ७६ बालकांची OAE (Otoacoustic Emissions) या प्राथमिक श्रवण तपासणी पद्धतीद्वारे कानांची व ऐकण्याच्या क्षमतेची तपासणी करण्यात आली.
कमी वजनाने जन्मलेली, मुदतपूर्व जन्मलेली तसेच SNCU मध्ये उपचार घेतलेली बालके श्रवणदोषाच्या दृष्टीने अतिजोखमीची असू शकतात. अशा बालकांमध्ये श्रवणदोषाचे लवकर निदान होण्यासाठी OAE तपासणी महत्त्वपूर्ण ठरते. वेळेवर तपासणी व आवश्यकतेनुसार पुढील निदान आणि उपचार केल्यास बालकांच्या श्रवणविकासासाठी योग्य हस्तक्षेप करणे शक्य होते.
सेवा संकल्प अभियानांतर्गत डीईआयसी, गडचिरोलीमार्फत राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमामुळे अतिजोखमीच्या बालकांमध्ये श्रवणदोषाचे लवकर निदान करण्यास मदत होत असून, बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने हे महत्त्वपूर्ण पाऊल आहे.




Petrol Price




